‘मला आजही असे वाटते की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे’, फडणवीसांच्या विधानाने चर्चांना उधाण

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मला एकही दिवस जाणवले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असे वाटते की मी मुख्यमंत्रीच आहे’ असे वक्तव्य केले आहे.

फडणवीस म्हणाले की, ‘तुमच्यासारखे नेते पाठीशी, सोबत असल्यामुळे मला एकही दिवस वाटले नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही. मला आजही असे जाणवते की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचे नाही. तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिले नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सोमवारच्या महाराष्ट्र बंदवरून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या जनतेला आर्थिक मदत देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद म्हणजे सरकारपुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारचा ढोंगीपणा जनतेपुढे उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईल व त्यासाठी तेथील सरकार समर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यात लक्ष घातले आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहेत. राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही किंवा कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांना मदत देणे सोडून सरकारपुरस्कृत दहशतवाद महाविकास आघाडीतील नेत्यांनी हाती घेतला आहे. निष्पाप लोकांना मारहाण करण्यात आली.

पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने जनतेला बंद करण्यासाठी सक्ती करण्यात आली. हा सरकारी व्यवस्थेचा मोठा गैरवापर आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार होतो, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना लाठय़ा-काठय़ांनी तुडविले जाते, तेव्हा यांना जालियनवाला बाग आठवत नाही, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.

महत्वाच्या बातम्या