fbpx

विधानसभेला बारामतीची जागा जिंकणार असा दावा मी कधीच केला नव्हता : पाटील

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशातच बारामती विधानसभेविषयी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती जिंकणार असा दावा मी कधीच केला नव्हता अस विधान केले आहे.

बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ”आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती जिंकणार असा दावा मी कधीच केला नव्हता कारण बारामतीमध्ये अजितदादांनी केलेली विकास कामे पाहता त्यांना बारामतीत पराभूत करणे हा आशावाद ठरेल. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे वर्चस्व गाजवू,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, पुढे बोलताना मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी आहे त्यामुळे मी हे खुलेपणाने मान्य करतो, तसेच या माझ्या विधानामुळे अजितदादांनाही निश्चित बरं वाटेल असंही पाटील म्हणाले आहेत.