भाजप-सेनेच्या युतीसाठी मी पंतप्रधानांना भेटलो – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे़ त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात़ युती करण्यासाठी भाजप तयार आहे, मात्र जर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली तर भाजपपेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे़ युतीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे़ उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याविषयी त्यांना सांगितले आहे़ सत्तेतील हे दोन पक्ष विभक्त झाल्यास राज्याचेही मोठे नुकसान होणार आहे़ काहीही झाले तरी आरपीआय मात्र भाजपसोबत राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले़ आहे. पंढरपूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़.

दरम्यान, शिवसेनेच्या लोकसभेतील एका खासदाराने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, 2014 साली भाजपाशी युती केल्यामुळे शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी देशभरात मोदी लाट होती. यावेळी भले मोदी लाटेचा तितकासा प्रभाव नसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होईल.

मात्र, हे नुकसान सीमित ठेवायचे असेल तर शिवसेनेला भाजपासोबत युती करण्याशिवाय गत्यंतर नाही. युती न केल्यास शिवसेनेला लोकसभेच्या अवघ्या पाच ते सहाच जागा जिंकता येतील. ही बाब आम्ही उद्धवजींच्या लक्षात आणून दिली असल्याचे या खासदाराने सांगितले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेंना आता अजूनच उधान आले आहे.