राजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आपापल्या मतदार संघामध्ये विकास कामांचे उद्घाटन करत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नेते आपल्या विरोधात असलेल्या नेत्यावर टीका करतात किंवा आपण त्या विरोधकापेक्षा किती उजवे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना चांगलेच झापले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखानदार व खासदार संघटनेचे मॅच फिक्सिंग आहे. आपल्या कार्यकर्त्यांना अगोदर ऊस घालण्यास सांगून दोन- तीन महिन्यांनंतर आता त्यांना आंदोलन सुचले आहे. मी गेली १५ वर्षे त्याच शाळेत होतो. त्यामुळे त्यांच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत, असे राजु शेट्टींना झापण्यात आले आहे.

याआधी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर टीका केली होती व आंदोलनाचा इशारा देखील दिला होता त्यावरच खोत यांनी चांगलाच प्रतिहल्ला यावेळी केला. तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासहित देण्यास भाग पाडू, शेतकऱ्यांनी त्याची चिंता करू नये असा विश्वास देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिला.