‘राज्यपाल कोश्यारींसारखा भला माणूस मी पाहिला नाही!’, अमृता फडणवीसांचे गौरवोद्गार

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडलीय. राज्यपालांच्या परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या दौऱ्यावरुन ठाकरे सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी सरकारच्या नाराजीनंतरही दौरा करण्याचं निश्चित केले आहे. पण यात थोडासा बदल करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याला सरकारकडून विरोध होत असल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी भाष्य केले आहे. ‘राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा असून, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील. हा त्यांच्या मनात राग असेल, त्याबद्दल मला माहिती नाही. पण असे व्हायला नको’, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

राज्यपालांच्या दौऱ्यावर पालकमंत्र्यांनी अघोषित बहिष्कार घातला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. यामुळे राज्यपालांचा आजपासून सुरु होत असलेल्या दौऱ्यावरील वादाचं मळभ आणखी गडद होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नियोजित दौऱ्याप्रमाणे नांदेड येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उदघाटन न करताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा ताफा विद्यापीठाबाहेर गेला. नांदेड येथील अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहावरून राज्यात राज्य सरकार आणि राज्यपाल असा वादंग निर्माण झाला होता. परंतु, आज स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील कार्यक्रम आटोपून राज्यपाल वसतिगृहाच्या उद्घाटन स्थळी येणार होते. परंतु हा उद्घाटन कार्यक्रम न करताच राज्यपालांचा ताफा दुसरीकडे वळाला. त्यामुळे अल्पसंख्याक वसतिगृहाचे उद्घाट न करताच राज्यपाल पुढे निघून गेल्यामुळे नवाब मलिकांचा पारा उतरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या