मला बंदोबस्ताची गरज नाही, आधी याला घेऊन जा; धनंजय मुंडेनी वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

उस्मानाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अपघात झालेल्या एका दुचाकीस्वादरास मदत करून त्याचे प्राण वाचवले. त्याचबरोबर मला बंदोबस्ताची गरज नाही. आधी याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना मुंडेनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना केल्या. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेसाठी उस्मानाबादला जात असताना हा अपघात झाला होता.

सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कळंब-ढोकी रस्त्यावर पिंपळगाव वाटीजवळ उस्मान शेख निपाणी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यात आलेल्या म्हशीची दुचाकीला जोराची धडक बसली. यात उस्मान शेख हे जखमी होऊन रस्त्यावर पडले. त्यांच्या डोळ्यातून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला, त्याचवेळी कळंबहून उस्मानाबादकडे जात असलेल्या धनंजय मुंडे यांनी रस्त्यावरील जखमी व्यक्तीस पाहून गाडी थांबवली आणि जखमी शेख यांची विचारपूस केली. सोबतच पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस गाडीमधून तातडीने शेख यांना उस्मानाबादच्या रुग्णालयात रवाना केले.

मला बंदोबस्ताची गरज नाही, आधी याला तातडीने घेऊन जा अशा सक्त सूचना देत उस्मानाबादच्या रुग्णालयातील डॉक्टरांनाही रूग्णाची काळजी घेण्याच्या सूचना देऊन ते उस्मानाबादकडे रवाना झाले. सध्या शेख यांच्यावर उपचार सुरु आहेत.