fbpx

‘दिवसा स्वप्न बघणाऱ्यांना आणि खोटे बोलणाऱ्यांना मी थांबवू शकत नाही’

अकलूज : देशात पाच वर्षातील सत्ता काळात भाजपाकडून एकही घोटाळा झाला नाही. मात्र विरोधकांना हे पाहवत नाही, म्हणून सातत्याने विरोधकांकडून खोटे आरोप केले जात आहेत. दिवसा स्वप्न बघणाऱ्यांना आणि खोटे बोलणाऱ्यांना मी थांबवू शकत नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

अकलूज (ता़ माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान,यावेळी बोलताना मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार हे वाऱ्याची हवा ओळखतात, त्यामुळेच त्यांनी माढ्यातून माघार घेतली, दुसऱ्याचा बळी गेला तरी चालेल पण ते स्वत:च्या कुटुंबियांवर ओरखडाही येऊ देत नाहीत, असा घणाघात मोदींनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीची महामिलावट कधीच देशाला मजबूत सरकार देऊ शकत नाही, असं म्हणत मोदींनी आघाडीवर निशाणा साधला. माढ्यातील लोकांना मजबूत हिंदुस्थान पाहिजे की मजबूर, असा प्रश्न देखील मोदींनी उपस्थितांना केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त हे माझ्याविरूद्ध लढत आहेत. या देशाला भविष्यात कुठे घेऊन जाययचे याबाबतचा अजेंडा विरोधकांकडे नाही. विरोधकांकडून यंदाच्या निवडणुकीत फक्त एकच नारा देण्यात येत आहे तो म्हणजे मोदी हटाव… मोदी हटाव…असे मोदी म्हणाले.