fbpx

मला माझा काका लयं खंबीर आहे – अजित पवार

अकलूज : कधीकधी लोकांना वाटत अजित पवार खूप बोलतो पण मी माझ्यासाठी नाही तर जनतेसाठी बोलतो. मला माझा काका लयं खंबीर आहे. आम्ही सर्व काही गोरगरीब जनतेसाठी मागत आहोत. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचं विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आज अकलूजमध्ये आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

भाजप – शिवसेना सरकारला पायउतार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यामध्ये निर्धार परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूजमध्ये परिवर्तन यात्रेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर पक्षाने सर्वकाही देऊन देखील काही नेते पक्षा विरोधातच काम करतात म्हणत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांची कानउघाडणी केली आहे.

2014 साली माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खा विजयसिंह मोहिते पाटील यांना अकलूज आणि माळशिरसमधील जनतेने वाचवले, बाकीच्यांनी नाही. माढा, करमाळा, माण, फलटण आणि सांगोल्यात कमी मत मिळाली. आम्ही या भागातील नेत्यांना आपलं आपलं म्हणून काही कमी पडून दिल नाही. पण ते विरोधात काम करतात, म्हणत पवार यांनी नेत्यांना सुनावलं आहे.

भाजप – शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. हे सर्व थांबायला हवं. तसं झाल नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्यातला गरीब माणूस हा गरीबच राहील. मोदींच सरकार हे गरिबांच नाही तर सुटबुट वाल्यांचं आहे. आजवर आम्ही कधीही जाहिरातीवर खर्च केला नाही. मात्र मोदी सरकारने हजारो कोटी रुपये जाहिरातींवर उधळल्याचा आरोप यावेळी अजित पवार यांनी केला.