मुख्यमंत्र्यांच्या मंचावर क्षीरसागर यांची उपस्थिती; विकास पाहूनच भाजपला पाठींबा : क्षीरसागर

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदाानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर अनेक नेते उपस्थित होते.

या सभेत जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. सभेला उद्देशून बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आता सरकारला शिव्या देतात आणि निवडणुकीनंतर इव्हीएम मशीनला शिव्या देतात. एवढंच काम त्यांच्या हाती आहे. तसेच क्षीरसागर यांनी उजनीचे पाणी मांजरा धरणात सोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. भाजपाने केलेला विकास पाहूनच आपण त्यांच्या पाठिशी उभे राहिलो. बीड जिल्ह्यातून मोठी ताकद प्रितम यांच्या पाठिशी उभी करू आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून देवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या सभेला जिल्हाभरातून आलेल्या लोकांनी प्रचंड गर्दी केली. वंजारी वसतिगृहाचे मैदान खचाखच भरून बाहेरचे रस्तेही गर्दीने व्यापले होते. उच्चांकी गर्दीने ही सभा रेकॉर्डब्रेक ठरली.