मी जनतेचा जनादेश घ्यायला आणि हिशेब द्यायला यात्रेवर निघालोय : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची ताकद वाढवण्यासाठी महाजनादेश यात्रेवर आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्र जनादेश’ यात्रेला सुरवात झाली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातून ‘महा जनादेश’ यात्रेचा शुभारंभ झाला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सगळ्यांचा जनादेश घ्यायला निघालोय व आम्ही केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आता निघालो आहे. तसेच महाजनादेश यात्रा जनतेचा आशीर्वाद घेण्याकरिता आहे. आमचं दैवत जनता आहे. पाच वर्षे आम्ही वचन दिल्याप्रमाणे काम केले. त्यामुळे आता काम पूर्ण केलं की नाही हे विचारायला आम्ही आलो आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता दिली, महाराष्ट्रातल्या गावामध्ये जाऊन पुन्हा एकदा यात्रेची सुरुवात करतोय, महाराष्ट्रात सगळ्या समस्या संपल्या असा दावा आम्ही करत नाही, मात्र गेल्या सरकारपेक्षा आम्ही त्यापेक्षा दुप्पट काम केलीत,असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आपली सत्ता कायम राहण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप युतीला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील भाजप युतीची सत्ता कायम राहील, असा अंदाज राजकीय तज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महा जनादेश यात्रा’ देखील परिणामकारक ठरणार आहे.