मी अद्याप भारतीय संघाबद्दल विचार करत नाही : व्यंकटेश अय्यर

vyktesh

नवी दिल्ली : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर मात करत कोलकाता नाईट रायडर्सने 3 विकेट्स राखून  रोमहर्षक विजय नोंदवला आणि यासह त्यांनी आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता विजेतेपदासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता हे दोन संघ भिडतील. केकेआरच्या विजयात सलामीवीर व्यंकटेश अय्यरनेही मोलाचा वाटा उचलला, ज्याला ‘सामनावीर’ म्हणूनही गौरवण्यात आले.

सामन्यानंतर, व्यंकटेश अय्यरने टीम इंडियाकडून खेळण्याच्या त्याच्या इराद्यावरील बोलले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा डावखुरा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने बुधवारी रात्री शारजा येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आणखी एक अर्धशतक ठोकले. या मोसमात त्याचे, हे तिसरे अर्धशतक ठरले. त्याने 41 चेंडूत 55 धावा केल्या ज्यासाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्कारही मिळाला.

व्यंकटेश अय्यरला त्याच्या शानदार खेळीसाठी ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. विजयानंतर तो म्हणाला, ‘मला जे सांगितले गेले ते मी करत आहे, मला सामना जिंकण्यात खूप आनंद झाला आहे. घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये कोणताही फरक नाही. इथे माझ्या स्वतःच्या शैलीत खेळायचे होते आणि मी करत आहे.’

तसेच, जेव्हा व्यंकटेशला त्याच्या भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याच्या स्वप्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘मी अद्याप भारतीय संघाबद्दल विचार करत नाही. अजून एक खेळ शिल्लक आहे आणि त्यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. आता कोलकाताला अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्ज सोबत सामना करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या