‘मी काय म्हातारा झालो का? मोदीला घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

निफाड : या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करत काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.ते निफाडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते.

सभेत शरद पवार यांनी मोदी आणि भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.लोकांनी मोदींना संधी दिली पण त्यांनी भ्रमनिरास केला, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.दरम्यान,असेल नसेल ती शक्ती बळीराजाच्या भल्यासाठी वापरण्यासाठी घडयाळाच्या चिन्हावर बटण दाबून राष्ट्रवादीला विजयी करा असं आवाहनही शरद पवार यांनी केले.

पवार म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था सुधाऱण्यासाठी मला फक्त ६० दिवसांची मुदत द्या, आश्वासनं पूर्ण नाही केली तर फटके मारा असं मोदी म्हणाले होते, आता त्यांना कोणत्या चौकात बोलवायचं असा सवाल उपस्थितीत करत पवारांनी मोदींवर घणाघाती टीका केली.