मी पुण्याचा अत्यंत ऋणी- मारुती चितमपल्ली

पुणे, अपूर्व कुलकर्णी-पुण्यात आल्यानंतर माझ्या लेखनाला चालना आणि प्रसिद्धी मिळाली त्यामुळॆ मी पुण्याचा अत्यंत ऋणी आहे या शब्दांत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ, पर्यावरणाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी पुण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . मारुती चितमपल्ली, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, कवी अंकुश आरेकर, लता ऐवळे, गायक सलील कुलकर्णी या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना एकाच मंचावर पाहण्याचा योग आज पुणेकरांसाठी जुळून आला. निमित्त होते ते ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आयोजित १२व्या पर्यावरण स्नेही साहित्य संमेलनाचे.

पर्यावरण हा तसा महाराष्ट्रवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यालाच अनुसरून गेल्या १२ वर्षांपासून ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण स्नेही साहित्य संमेलन’ आयोजित केले जाते. या वर्षीच्या संमेलनाध्यक्ष पदाचा मान ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ आणि साहित्यिक श्री. मारुती चितमपल्ली यांना मिळाला.

संमेलनाचे उदघाटन वृक्षारोपण करून करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी या संमेलनामागची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर ‘चंगळवाद आणि पर्यावरण’ या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख वक्ते ‘अच्युत गोडबोलेे’ यांनी पर्यावरणाविषयक अनेक बाबींवर प्रकाश टाकला.विषमता वाढली की चंगळवाद वाढतो असे ते म्हणाले. यानंतर आनंद चंगेडिया, निरंजन वेलणकर आणि पर्यावरण या विषयावर लघुपट करणाऱ्या टीमचा विशेष पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी अंकुश आरेकर आणि कवयित्री लता ऐवळे यांनी स्वरचित ‘रानातल्या कविता’ सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. त्यानंतर प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांचा ‘हिरवाई’ हा गाण्याचा कार्यक्रम सादर झाला. त्यांना आदित्य आठले यांच्या तबल्याची सुरेख साथ लाभली. या कलेला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

संमेलनाच्या अखेरच्या सत्रात साहित्यिक जयंत कर्णिक यांनी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून श्री चितमपल्ली यांचा सर्व जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. त्यांचे जंगलातले अनुभव ऐकतांना श्रोते भारावून गेले होते. ‘केशराचा पाऊस’ या आपल्या पुस्तकाची कहाणी त्यांनी सर्वांसमोर मांडली. आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या घटनेबद्दल बोलताना त्यांनी टीकेला उत्तर न देता गप्प बसणे हाच सर्वोत्तम उपाय असतो असे सांगितले. जंगलातील सृष्टीलाही जीव आहे.शेतकऱ्यांनी निसर्गशेती करण्यावर भर द्यावा असे त्यांनी सुचवले. त्यांनी अनेक मोठ्या लेखकांच्या भेटींनाही यावेळी उजाळा दिला. पुण्यात आल्यावर माझ्या लेखनाला चालना आणि प्रसिद्धी मिळाली त्यामुळॆ मी पुण्याचा अत्यंत ऋणी आहे या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.