जबाबदारी वाढली असली तरी पर्वतीमधून मीचं लढणार : माधुरी मिसाळ

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपकडून पक्ष संघटनेत बदल केले जात आहेत. राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनी वर्णी लागल्यानंतर आता शहर पातळीवर देखील पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांची पुणे शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. इतिहासात पहिल्यांदाचं शहराध्यक्ष पदी महिलेची वर्णी लागली आहे.

माधुरी मिसाळ यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या जागी पर्वती विधानसभा मतदार संघाला भाजप दुसरा चेहरा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतू या सर्व प्रकरणावरून माधुरी मिसाळ यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘पद असले की निवडणूक लढवता येणार नाही असा पक्षात नियम नसल्याचे सांगत त्यांनी आपण पर्वतीमधून दावेदार असल्याचेही स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना मिसाळ यांनी भाजप सेनेच्या युतीवर भाष्य करताना ‘युतीचा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा आहे. त्यामुळे याबाबतीत काहीच बोलणार नाही. पक्षाने आदेश दिल्यावर त्याप्रमाणे काम करणार. त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, पक्षाची शहरातील ताकद वाढवण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले आहे. पुण्यातील जागांवर युती संदर्भात पक्षश्रेष्ठी नेमकी की भूमिका घेणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, माधुरी मिसाळ यांनी शहराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना मावळते अध्यक्ष योगेश गोगावले यांनी ‘शहराध्यक्ष म्हणून साडेतीन वर्षे काम करता आले. नेतृत्वाने दिलेले सर्व आदेश चोखपणे पार पाडले. सहकाºयांची त्यासाठी फार मदत झाली. त्यांच्याशिवाय काम करता आले नसते. पक्षाचे सक्षम असे संघटन शहरात उभे करता आले, त्याची ताकद काय आहे ते महापालिका, लोकसभा निवडणूकीत दिसून आले असं विधान केले आहे.