‘मी मागासवर्गीय आहे म्हणून मला त्रास दिला जातोय’, समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार

‘मी मागासवर्गीय आहे म्हणून मला त्रास दिला जातोय’, समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप सातत्याने सुरू आहेत. यामुळे राज्यातील राजकारण हे तापलेले आहे. मलिक हे वानखेडेंविषयी दररोज नवनवीन आरोप करत आहेत.

यानंतर आता केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी तक्रार केली आहे. ‘मागासवर्गीय असल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे. यामुळे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत.’ अशी तक्रार समीर वानखेडे यांनी केली आहे. त्यांनी नागरी सेवा उत्तीर्ण होताना दाखवलेले जात प्रमाणपत्र हे खरे असून बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात असल्याचेदेखील त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

‘आपण नागरी सेवेदरम्यान सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्य असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही. यामुळे जे आरोप केले जात हे त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय आयोगाकडे दिली आहे. याविषयी समीर वानखेडे यांनी जे खरे आहे ते समोर आणावे आणि योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.

तर दुसरीकडे, वानखेडेंच्या बहिण यास्मिन वानखेडे यांनी मलिकांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये देखील तक्रार दाखल केली आहे. यासोबतच या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. एका महिलेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी त्यांनी पत्र लिहून राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. एक नोकरदार माणसाच्या जन्म प्रमाणपत्राबाबत शोध घेणारे नवाब मलिक कोण आहेत? त्यांची रिसर्च टीम दुबईपासून मुंबईपर्यंत आमचे फोटो पोस्ट करत आहेत. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप यास्मिन यांनी केला आहे.

नवाब मलिकांचे आरोप काय?
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. याच दरम्यान मलिकांनी समीर वानखेडेच्या पहिल्या लग्नाचे फोटो, निकाहनामा आणि समीर यांचे जन्म प्रमाणपत्र जाहिर केले आहे. तसेच समीर हे मुस्लिम असल्याचे म्हणत त्यांच्या कुटुंबावर आरोप केले आहेत. यासोबतच समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांच्यावरही वसुलीचा आरोप करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या