सैन्याचा अपमान करणाऱ्या भागवतांची मला लाज वाटते- राहुल गांधी

rahul vr bhagwat

नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी मोहन भागवतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दोन दिवसांतच तयार होऊ शकतो. असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा देशभरातून निषेध व्यक्त होत असून राहुल गांधी म्हणाले भागवतांचे हे वक्तव्य प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे आहे. यामुळे सीमेवर शहीद होणाऱ्या जवानाचा अनादर झाला. शहीदांचा आणि सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या भागवतांची आपल्याला लाज वाटते.

भारतीय सैनिकांबद्दल वक्तव्य केल्यामुळे राजकीय स्तरातून मोहन भागवतांना विरोध होत आहे. मात्र भागवतांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या मोहन भागवतांनी रविवारी मुझफ्फरपूर येथे कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना हे वक्तव्य केले होते. सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. संघप्रमुखांनी भारतीय नागरिकांचा व सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान केला आहे. हा तिरंग्याचाही अपमान आहे, कारण प्रत्येक जवान हा तिरंग्याला सलाम करतो. शहीद जवानांचा आणि भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या भागवतांची मला लाज वाटते, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.