‘…अरे मी आमदार आहे इथे’, रवी राणा संतापले

‘…अरे मी आमदार आहे इथे’, रवी राणा संतापले

ravi rana

अमरावती : अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये सर्वांसमोर तू-तू-मै-मै झाली. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी रवी राणा यांनी जोर लावून धरली होती. त्यानंतर ठाकूर आणि राणा यांच्यात तू-तू-मै -मै बघायला मिळाली. दरम्यान, यानंतर यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली असून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे नाटक सोडून लोकप्रतिनिधींशी कसे वागावे हे शिकावे असा टोला लगावला आहे.

बैठकीदरम्यान रवी राणा यांनी आपल्याला बोलायचे असल्याचे सांगत आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याने आक्षेप नोंदवला. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची मागणी यावेळी ते करत होते. दरम्यान त्यांचा वाढलेला आवाज पाहून यशोमती ठाकूर यांनी त्यांना आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही असं सांगत संताप व्यक्त केला. यानंतरही रवी राणा यांनी आपलं म्हणणं मांडलं. इथे दादागिरी चालणार नाही असंही ते म्हणाले. ठराव घेऊन शासनाला पाठवावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

दरम्यान, राणा आणि ठाकूर यांच्यातील वादाची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. तसेच बैठकीनंतर बोलताना रवी राणा यांनी फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजित केली असल्याची टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर शेतकरी मातोश्रीवर जातील आणि उद्धव ठाकरेंची दिवाळी साजरी होऊ देणार नाहीत असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या