‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य

‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य

बीड : सध्या राज्यभरात करुणा शर्मा प्रकरण चांगलेच गाजत आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांची पोलखोल करण्यासाठी आपण परळीत येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, परळीत आल्यावर त्यांना अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागला. ३०७ चा गुन्हा, एट्रॉसिटीची केस तसेच वाहनात बंदूक सापडणे या प्रकारामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सध्या करुणा १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत आहेत. या सर्व प्रकरणावर मंगळवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मौन सोडत परळी सुन्न झाल्याचे सांगत राज्यभरात परळीची मान खाली गेल्याची पोस्ट केली.

धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी पंकजा यांनी प्रथमच करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केले. तसेच खासदार प्रीतम मुंडे यांनीही पंकजा यांचे ट्विट रिट्विट केले. त्यामुळे धनंजय यांना कौटुंबिक पाठिंबा नसल्याचे सिद्ध झाले. इतके सर्व होत असताना धनंजय मुंडे शांत होते. मात्र, त्यांनीही सोशल मीडियाद्वारे आपण बहिणीच्या पाठिशी सदैव असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

त्याचे झाले असे की, रक्षाबंधन होऊन पंधरवडा उलटला तरीही राष्ट्रवादीच्या नेत्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी धनंजय मुंडे यांची प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. त्यामुळे आज धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे यांची भेट झाल्यानंतर अदिती यांनी त्यांना राखी बांधली. याबाबत भावना व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली.

धनंजय यांनी सांगितले की, ‘माझ्या लहान भगिनी राज्यमंत्री कु.अदितीताई तटकरे यांनी आज राखी बांधली. यावर्षी कामातील व्यस्ततेमुळे आमचे रक्षाबंधन थोडे उशिरा साजरे झाले. माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’. पंकजा यांनी विदेशातून संदेश लिहित धनंजय यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतरही आपण बहिणीच्या पाठीशी सदैव असल्याचे वक्तव्य धनंजय यांनी केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकद असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत, हा विश्वास हरवू नये. चुकीचा पायंडा पडू नये, ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे, राज्याची’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी करुणा शर्माप्रकरणी सोशल मीडियावर मौन सोडले.

महत्त्वाच्या बातम्या