fbpx

मी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचा आदेश मिळाला तर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती होणार आहे, असे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सांगितले.

दक्षिण लोकसभेसाठी शिवसेनेने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रा. बेरड म्हणाले, शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र लोकसभेसाठी शिवसेना-भाजपची युती शंभर टक्के होणार आहे. युती झाली तर नगर दक्षिणेत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे काम करतील आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करतील.

नगर दक्षिणेत मात्र आपण स्वत: इच्छुक आहोत. पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करू. भाजपमध्ये पक्षाने आदेश दिला तर तो पाळला जातो. लोकसभेचाही निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. अस बेरड म्हणाले आहेत.

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे १९ आणि २० रोजी नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. बेरड बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळोखे, शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण, प्रदेश कार्यकारिणीचे पंडित वाघमारे आदी उपस्थित होते.