पतीच्या मित्राचा विवाहितेवर अत्याचार, साडेआठ लाखही उकळले

बीड : पतीच्या मित्राने तीन वर्षे अत्याचार करून साडेआठ लाख रुपये उकळले. ही धक्कादायक घटना परळीत गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी परळी शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून आरोपी फरार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, परळीत पीडित ३३ वर्षीय महिला कुटुंबीयांसह राहते. पतीचा मित्र नेहमी घरी ये-जा करत असे. यातून त्याच्याशी ओळख झाली. त्याने महिलेला धमकावून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आठ लाख रुपये व साठ हजार रुपये किमतीच्या दोन तोळ्याच्या अंगठ्या असे एकूण आठ लाख ६० हजार रुपये उकळले. ते परत मागितल्यावर पीडितेला काठीने मारहाण करून धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अर्जुन बाबूराव मुंडे (रा. वडवणी, ता. गंगाखेड, जि. परभणी) याच्यावर गुन्हा नोंद झाला.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यांनतर तिच्यावर परळी, बिदर येथे अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी केज तालुक्यातील युसूफवडगाव ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासात भावठाणा (ता. अंबाजोगाई) येथील रोहन भारत होके याने सदर मुलीचे अपहरण केल्याचे उघडकीस आले होते.

पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने शेवटी आरोपीच्या वडिलांनी पीडित मुलीसह आरोपी रोहन होके याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडित मुलीने दिलेल्या जबाबात आरोपी रोहन होके याने लग्नाचे आमिष दाखवून तिला सुरुवातीला परळी आणि तेथून बिदर येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी रोहन होके याच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.