पतीने घेतला चारित्र्यावर संशय, विवाहितेची पुण्यात आत्महत्या

sexual harassment by teacher in paithan

पुणे: चारित्र्यावरुन संशय घेऊन पतीसह सासरच्या लोकांकडून होणा-या छळाला कंटाळून वाकड येथे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कल्पना ऊर्फ निशा सिद्धार्थ गायकवाड (वय-30 रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) असे विवाहितेचे नाव आहे. तिने राहत्या घरी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी कल्पनाचा पती आणि सासरच्या चार व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, सिद्धार्थ कल्पनावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातूनच तिच्या सासरच्या मंडळीनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला होता. आई वडिलांना भेटू नको, शेजाऱ्यांशी बोलू नको असे सारखे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. सासरच्या मंडळींच्या या छळाला कंटाळून कल्पनाने अखेर टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.कल्पना आणि सिद्धार्थ यांच्या संसाराला 10 वर्षे पूर्ण झाली होती. त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. पोलिसांनी तपास करीत पती सिद्धार्थ सोमनाथ गायकवाड, सोमनाथ गायकवाड (सासरा), शाम सोमनाथ गायकवाड (दीर) ,घरातील दोन महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी पीडीतेची आई सुशीला भोसले ( जाफ्राबाद, जालना) यांनी तक्रार दिली आहे.