पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना

बीड : पत्नीकडून होणारा छळ आणि त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बीड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील वासनवाडी शिवारात घडली. याप्रकरणी पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. देवराव मोहन येवले (रा. येवलवाडी, ह.मु. वासनवाडी फाटा) असे मृत पतीचे नाव आहे.

देवराव यांची आई पार्वती मोहन येवले (६०) यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, देवराव यांना त्यांची पत्नी मुक्ताबाई ही सतत टोचून बोलत असे. शिविगाळ करून त्रास देत असे. याला कंटाळून १८ फेब्रुवारी रोजी देवराव येवले यांनी वासनवाडी फाटा परिसरात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मुक्ताबाई देवराव येवले (३६) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल आहे.

दरम्यान, अंबाजोगाई शहरातील शिक्षकाने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. प्रभाकर पोटभरे यांच्या तक्रारीनुसार, तू आमच्या मुलीला नांदवत का नाहीस या कारणावरून त्यांचा मुलगा मनोजकुमार पोटभरे यांना त्यांच्या सासरवाडीची मंडळी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती.

या त्रासाला कंटाळून मनोजकुमार यांनी १९ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शंकर गेणाजी वावळकर, पार्वतीबाई शंकर वावळकर, रवींद्र शंकर वावळकर, सुजाता रवींद्र वावळकर, सारिका मनोजकुमार पोटभरे (सर्व रा. संत नामदेव नगर, धानोरा रोड, बीड) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला.

महत्त्वाच्या बातम्या