दीड कोटींची लुट झाल्याचा बनाव, चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक

पुणे- रविवार पेठ भागातील सराफ व्यावसायिक अरविंद चोप्रा यांचे मुंबईतील झव्हेरी बाजार येथून येणारे तब्बल दीड कोटी रुपयांचे सोने लुटल्याची घटना समोर आल्यानंतरएकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक करून दीड कोटींची लुट झाल्याचा बनाव करणाऱ्या नोकरास तसेच त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिक अरविंद चोप्रा यांच्याकडे नोकरीस असलेला नोकर बेहाराराम शांतीलाल पुरोहित (३१) हा मालकाच्या सांगण्यावरून मुंबईतील झव्हेरी बाजार येथून येणारे तब्बल दीड कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे घेवून पुण्यात येत असताना म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडीयम समोर अज्ञात तीन इसमांनी रिक्षात घुसून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील ऐवज व मित्राने दिलेले ६० हजार तसेच त्याचा मोबाइल चोरून नेल्याची तक्रार दिली होती. या बाबत हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी बेहाराराम शांतीलाल पुरोहित याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सांगितलेल्या हकीकतीमध्ये तफावत आढळून आली. पोलिसांनी कसून चौकशी करताच गुन्हा झालाच नसल्याचे पुरोहित याने कबूल केले. पुरोहित आणि त्याचे दोन मित्र किशोर व नरेश रावल यांनी कट रचून हा गुन्हा केला असल्याचे समोर आले. तपास पथकांनी आरोपींना सुगावा न लागू देता,मुंबई पोलिसांच्या मदतीने पुरोहित याने त्याच्या दोन साथीदारांकडे लपवून ठेवलेला ऐवज हस्तगत केला. याव्यतिरिक्त ५ किलो चांदी देखील हस्तगत केली आहे.