‘गेल्या 100 वर्षात मानवजातीनं अशी साथ पाहिली नाही, त्यामुळे या विषयावरून राजकारण करू नका’

नरेंद्र मोदी

नवी दिल्ली-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधून कोविड-19 संबंधीत माहिती तसंचं सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाबद्दल त्यांना माहिती दिली. साथीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व सदस्यांनी या बैठकीत आपलं मत मांडलं असून विविध भागातून आलेल्या या सूचनांचं स्वागत करत देशासाठी योग्य धोरण आखण्यास या सूचनांची मदत होईल असं मोदींनी सांगितलं.

गेल्या 100 वर्षात मानवजातीनं अशी साथ पाहिली नाही. त्यामुळे हा राजकारणाचा विषय नसून संपूर्ण मानवतेसाठी चिंतेचा विषय आहे असं मोदी या वेळी म्हणाले. प्रत्येक जिल्हयात एक प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या लसीकरण मोहिमेच्या वाढत्या गतीबद्दलही पंतप्रधानांनी सर्वांना माहिती दिली. सुरवातीच्या 10 कोटी मात्रांना 85 दिवस लागले तर नंतरच्या 10 कोटी मात्रांना केवळ 24 दिवस लागल्याचं त्यांनी नमूद केलं. जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा पातळीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लसीकरणाचं योग्य नियोजन केलं पाहिजे यावर मोदींनी भर दिला.

लसीकरण मोहिमेला 6 महिने पूर्ण झाले असून अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि कोरोना योद्ध्यांना अद्याप लस मिळाली नसल्यामुळे पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे राज्यांनी अधिक सक्रीय होण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. इतर देशांमधील परिस्थिती पाहून आपण सतर्क राहण्याची गरज असल्याचं मोदींनी अधोरेखित केलं तसंचं या कठीण काळात यशस्वीरीत्या कोविन आणि आरोग्य सेतूच्या स्वरुपात देशाच्या तंत्रज्ञान वापरावर त्यांनी समाधान व्यक्त केलं.

दरम्यान आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशाच्या कोविड 19 स्थितीवर सविस्तर सादरीकरण केले. सध्या फक्त आठ राज्यांमध्ये दहा हजाराहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत तर फक्त 5 राज्यांचा रुग्ण वाढीचा दर 10 टक्क्यांच्या वर आहे अशी आशादायी बाब त्यांनी नमूद केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP