माणुसकीला काळिमा ! जन्माला येण्यापुर्वीच जातीय विषमतेमुळे मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा महाराष्ट्राला लाभला . मात्र या परंपराची  जोपासना एकविसाव्या शतकातही मागे राहिली का,  असा प्रश्न आजच्या घडीला घडणाऱ्या घटनांकडे पाहून वाटतं.

अशीच अमानुष घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी या गावातील लोकांनी मंगला पवार या महिलेच्या परिवारावर बहिष्कार टाकल्यामुळे मुल जन्माला येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

महिपाल पिंपरी या गावातील पारधी कुटुंबावर गावातील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. पीडित महिलेच्या सांगण्यानुसार,  गावकऱ्यांनी एक वर्षापासून या कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. या दरम्यान  मंगला पवार या गर्भवती राहिल्या. गावकऱ्यांनी वाळीत टाकल्यामुळे या कुटुंबाला इतर मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत. त्यामुळे या कुटुंबाचे अतोनात हाल होत होते.

यासर्व प्रसंगादरम्यान कुटुंबातील मंगला यांच्या पोटात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात त्वरित दाखल करणं गरजेचं होतं.

यासाठी महिलेच्या कुटुंबातील लोकांनी प्रवासी वाहतूक करणारे वाहन भाड्याने मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु गावकऱ्यांनी  वाळीत टाकल्यामुळे त्यांना वाहतूक व्यवस्था कोणी प्राप्त करून दिली नाही. या दरम्यान  मंगला यांच्या वेदना आता असह्य होत होत्या.

प्रचंड प्रमाणावर त्रास होऊनदेखील त्यांच्या मदतीसाठी कोणी पुढे सरसावलं  नाही. अशावेळी  त्यांना वेळेवर शहरातील दवाखान्यात गरजेचें होतं.

वाहनधारकांनी नकार दिल्यामुळे शेवटी मंगला यांना जवळपास सहा ते सात किलोमीटर पायी चालत न्यावं लागलं. चालत नेल्यामुळे गर्भवती मंगला यांचा गर्भपात झाला. प्रचंड मरण यातना सहन करत हे जग पाहण्याअगोदरच पोटचा गोळा  त्यांना गमवावा लागला.

एकविसाव्या शतकातही जाती व्यवस्थेमुळे पवार परिवाराला त्यांचे मुल गमवावे लागले. या अमानुष कृत्याविरुद्ध आता मंगला पवार यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.

याप्रकरणी जबाबदार असणार्‍या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मंगलाबाई पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

गावकर्‍यांच्या दबावामुळे प्रवाशी वाहनधारकांनी देखील पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकला असून या बहिष्काराबाबत यापूर्वीच पारधी महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शिला शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतरही पोलिसांनी खबरदारी न घेतल्यामुळे हा प्रकार घडला असून या प्रकारास जबाबदार असणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मंगला पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.