सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील पाहून तुम्हीही व्हाल अवाक

सांगली : सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाचा तपशीलही हळूहळू समोर येत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात सुमारे ११२ रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या ४३३, तर हरिपूर या एकाच गावात २५० घरांची मोठी पडझड झाली तर, सुमारे तीन हजार घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. हळदीच्या साठवणुकीसाठी वापरली जाणारी जमिनीतली १०० पेवं पाण्यात बुडाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात स्वच्छतेच्या कामाची गती वाढवण्याचे निर्देश पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले. पुराचं पाणी आलेल्या भागातल्या पूररेषा खूणेची कामं त्वरित करण्याच्या सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुरामुळे बाधित झालेल्या घरांचं संरचनात्मक परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी अभियंत्यांची पथकं तयार करण्यात आली असून, नेमून दिलेल्या भागातल्या घरांचं परीक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिऱ्यांनी दिल्या.

दरम्यान, पुरामुळे बंद असलेली मिरज – मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतूक कालपासून सुरू झाली. महालक्ष्मी, सह्याद्री, आणि कोयना एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर आणि सांगली इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मदतीची तीन वाहनं पाठवली आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ही वाहनं पूरग्रस्त भागांकडे रवाना झाली.