fbpx

नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये परत यावं : हर्षवर्धन पाटील

टीम महाराष्ट्र देशा- नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये परत यावं, असं काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘झी24 तास’ या वृत्तवाहिनीने दिलं आहे.नारायण राणे काँग्रेसमध्ये जाणार अशी माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावरचं हर्षवर्धन पाटलांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

काही कारणांमुळे काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांची काँग्रेसला गरज आहे. त्यांनी पुन्हा पक्षात आलं पाहिजे, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी पक्षात परत येण्याची हीच वेळ आहे, सर्वांनी एकत्र यायला हवंं, असही पाटील म्हणाले.

दरम्यान,स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातम्या प्रसारित करण्याचा माध्यमांनी सकाळपासून धडाका लावला होता. मात्र आता दस्तुरखुद्द नारायण राणे यांनीच यावर भाष्य केले आहे. मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. माझ्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या विनाकारण चर्चा होत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे. आज एनडीएच्या घटकपक्षांची दिल्लीत बैठक आहे. या बैठकीसाठी आपण दिल्लीत आल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणेचा पराभव झाल्यामुळे निराश असलेले नारायण राणे हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांवर आले होते. राणे पुढे म्हणाले की, मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निमंत्रण होते. त्यामुळे मी त्यांनी भेटायला महाराष्ट्र सदनात आलो. मुख्यमंत्र्यांच्या सदनातील टीव्हीवर आम्हाला राणे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची बातमी दिसली. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही असे त्यांनी म्हटले आहे .