fbpx

नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध रोखणार कसा?

भाऊ तोरसेकर- कुठल्याही लढाईत वा शर्यतीमध्ये कोणी तरी एकजण जिंकतो. पण त्याच्या जिंकण्याचा अर्थ इतर पराभूत होत असतात. मग ह्या पराभूतांना विजेत्याविषयी आकस वाटणे स्वाभाविक असते. पण तो आकस त्यांना विजयापर्यंत घेऊन जात नाही. अनेक कसोटी व क्रिकेट सामने सलग भारताला जिंकून देणारा दिग्विजयी कर्णधार विराट कोहलीला दक्षिण आफ़्रिकेत गेला, तेव्हा कुठल्याही पराभवाची भिती वाटली नव्हती. पण आरंभीच झालेल्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने भारत अत्यंत नामुष्कीच्या खेळाने हरला. तेव्हा आपल्या पराभवाचे समर्थन करत विराटने आफ़्रिकन खेळाडूंच्या नावाने बोटे मोडली नाहीत, की त्यांच्या खेळालाही नावे ठेवली नाहीत. उलट ते उत्तम खेळले आणि आम्ही भारतीय त्यांच्या तुलनेत अगदीच हास्यास्पद खेळलो, याची विराटने सरळ कबुली देऊन टाकली होती. आपल्या संघातील फ़लंदाजांचे खेळणे योग्य नव्हते, याची प्रामाणिक कबुली त्याने दिली आणि तिथून खेळाचा रंग बदलत गेला. चुक कबुल केली, मग आपल्यातले दोष वा त्रुटी शोधायला आरंभ होत असतो. पर्यायाने त्या त्रुटी कमी करण्याचे प्रयास सुरू होत असतात आणि त्याच्याच परिणामी निर्दोष खेळाकडे वाटचाल सुरू होत असते. विराटच्या संघाची कथा वेगळी नाही. दोन सामने पराभूत झाल्यावर आपल्या चुका शोधण्यात त्याच्यासह भारतीय खेळाडू रमले आणि त्यांनी त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली. तर काय परिणाम झाला? तिसराच कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला. भले कसोटी मालिका गमावली असेल, पण पराभवाची मालिका संपली होती. विजयाला आरंभ झाला होता. म्हणूनच पुढली एकदिवसीय मालिका भारत सहजगत्या जिंकू शकला. २०-२० मालिकाही खिशात घालता आली. पण आपल्या चुकांवर विराट पांघरूण घालत बसला असता तर? तर त्याची कॉग्रेस वा विरोधी पक्ष झाला असता ना?

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस मागल्या पाच वर्षात सातत्याने कशाला पराभवाचा सामना करते आहे? त्याचे विश्लेषण पुरोगामी पत्रकार करायला तयार नाहीत की खुद्द विरोधी पक्षातले दिग्गज नेतेही आपल्याच नाकर्तेपणाचे विवेचन करायला राजी नाहीत. त्यातले सत्य इतकेच आहे, की मोदी किंवा शहा हे निवडणूका जिंकत नसून त्यांचे विरोधक त्यात पराभूत होत आहेत. त्या पराभवाचा परिणाम म्हणून भाजपा वा मोदी जिंकताना दिसत आहेत. ताज्या निवडणूकांमध्ये इशानेकडील तीन राज्यात कॉग्रेस पुरती नामोहरम होऊन गेली आहेच. पण त्रिपुरा हे डाव्यांच्या दिर्घकाल कब्जात असलेले राज्यही भाजपाच्या झोळीत जाउन पडले आहे. त्याचे कारणही नेमके तेच आहे. भाजपा देशाच्या कानाकोपर्‍यात आपले संघटनात्मक सामर्थ्य विस्तारण्यासाठी अहोरात्र झटत आहे आणि त्यांच्याशी मैदानात उतरून सामना करताना विरोधकांची दमछाक झालेली आहे. उदाहरणार्थ त्रिपुराचे उदाहरण बघता येईल. मागल्या म्हणजे पाच वर्षापुर्वीच्या निवडणूकीत भाजपाला एकही आमदार तिथे निवडून आणता आला नव्हता. मतेही अवघी दिड टक्का मिळालेली होती. पण लोकसभा जिंकल्यापासून प्रत्येक राज्यात पाय रोवण्याचा निर्धार करून पक्षाध्यक्ष अमित शहा कामाला लागले आणि त्यांनी त्या त्या राज्यात समर्थ असलेल्या पक्षाला आव्हान देण्यासाठी त्यांच्या विरोधातील प्रत्येक मत आपल्याकडे येईल, अशी रणनिती आखली होती. त्यानुसार तृणमूल वा कॉग्रेस हे त्रिपुरातील प्रमुख पक्ष होते. पण त्यांच्या नेतृत्वाने कधी तिथे डाव्यांना आव्हान दिलेले नव्हते. अमित शहांनी अशा पक्षातल्या नाराजांना हाताशी धरण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या कार्यकर्ते व मतदारांना कुठल्याही झेंडा वा विचारधारेशी कर्तव्य नव्हते, तर डाव्यांच्या जोखडाखालून त्रिपुराला बाहेर काढायचे होते. अशा नाराजांची मोट म्हणजे आजचा त्या राज्यातील भाजपा झाला आहे.

कुठल्याही सत्तेला लोकशाहीत सर्व लोकांचा पाठींबा नसतो आणि जितके सत्ताधार्‍यांच्या बाजूचे असतात, त्यापेक्षा अधिक लोक विरोधात असतात. पण त्यांच्या मतातील विभागणी मोठ्या पक्षाला सत्ता व बहूमत मिळवून देत असते. भाजपाने विविध राज्यातील अशा नाराजांची मोट बांधण्याची रणनिती अवलंबली आहे. उलट भाजपाच्या विरोधातल्या बहुतेक पक्षांना तितक्या ठामपणे भाजपा विरोधातील मतांची मोट बांधण्याचे कौशल्य साधता आलेले नाही. त्यामुळे भाजपाला मतविभागणीचा लाभ मिळत रहातो. ते रहस्य ओळखून विरोधातील नेत्यांनी व पक्षांनी आपल्या पराभवाची मिमांसा केली पाहिजे. आपण भाजपाचे विरोधक आहोत, पण त्याला विरोध करताना अन्य कुठल्या भाजपा विरोधकाशीही लढत रहातो, हा खरा दोष आहे. भाजपाला पराभूत झालेले बघायचे असेल, तर मायावतींनी अखिलेश-मुलायम यांच्या विजयामध्ये दु:खी व्हायचे टाळले पाहिजे. डाव्यांनी कॉग्रेस वा ममताच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांच्याशी तडजोडी करून भाजपाला पाणी पाजण्याची मानसिकता दाखवली पाहिजे. सर्व घोडे तिथेच अडले आहे. ही एक बाजू झाली. म्हणजे मतविभागणीचा लाभ भाजपाला मिळतो हा त्यातला एक घटक आहे. दुसरा घटक भाजपाला पर्याय म्हणून पुढे येण्याचा. ते काम संघटनात्मक मेहनतीचे असून तिथेही विरोधक आळशी आहेत. त्यांना मैदानात उतरून म्हणजे लोकांमध्ये जाऊन आपली लोकप्रियता सिद्ध करायची मेहनत नको आहे. त्यापेक्षा माध्यमातून तोंडपाटिलकी करून जनमत फ़िरवण्य़ाचे पोकळ मनसुबे चालू असतात. नुसती आरोपबाजी वा चिखलफ़ेक करून भाजपाची मते कमी होत नाहीत. मतदाराला विरोधातला कुठला तरी पक्ष वा नेत्याचा विश्वास वाटणे अगत्याचे आहे. राहुल गांधी माध्यमात खुप बुडबुडे उडवतात. पण कसोटीचा प्रसंग येतो तेव्हा आजीकडे वा परदेशी मौज करायला निघून जातात. तिथे पराभवाची शाश्वती मिळत असते.

मोदी वा भाजपा यांच्यापाशी सत्ता व पैसा आहे म्हणून ते जिंकतात, या भ्रमातून विरोधकांना बाहेर पडण्याची गरज आहे. चिखलफ़ेक करायला असे मुद्दे उपयुक्त आहेत. पण ते माध्यमातील दिवाळखोरांना आवडणारे असले म्हणून मते मिळवून देत नाहीत. ते काम घरोघर जाऊन पोहोचणारा कार्यकर्ता व त्यांची मजबूत संघटनाच करू शकत असते. मागल्या कित्येक वर्षात कॉग्रेस व अन्य पक्षांनी आपापल्या राजकीय संघटना गुंडाळून ठेवल्या आहेत आणि संघटनात्मक बांधणीकडे साफ़ दुर्लक्षच केले आहे. नेमकी तीच बाजू भाजपाने मजबूत केली आहे आणि त्याचे प्रतिबिंब मतदानात पडताना दिसते. एका बाजूला संघटनात्मक फ़ळी उभारायची आणि दुसरीकडे आपल्या विरोधकांवर नाराज असलेले गट व घटक जमा करायचे, असे अमित शहांचे काम चालू असते. त्या दिशेने विरोधकांनी एकही पाऊल टाकलेले दिसत नाही. मग स्थिती भले भाजपाच्या विरोधात असेल वा मोदी सरकारविषयी नाराजी असेल, पण त्याचा मतांच्या दृष्टीने लाभ उठवणे कॉग्रेस वा अन्य पक्षांना शक्य होताना दिसत नाही. मागली दोनतीन वर्षे भाजपा त्रिपुरामध्ये आपली संघटनात्मक शक्ती वाढवत होता आणि ते मार्क्सवादी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ओळखता आलेले नसेल, तर त्यांची तिथे संघटना कसली आहे, असा प्रश्न विचारणे भाग आहे. तेच त्यांचे बंगालमध्ये झाले. टोळभैरव मोर्चा काढू शकतात वा धिंगाणा घालू शकतात. पण जिथे घरोघर फ़िरून लोकांची मते जिंकायची असतात, तिथे टपोरीगिरी वा उडाणटप्पू गर्दी कामाची नसते. उलट त्यांच्याकडून दुखावले जाणारे मतदार व जनता दुसर्‍या बाजूने झुकायला हातभार लावला जातो. त्रिपुरात सत्तांतर होताच जमावाने लेनिनचा पुतळा फ़ोडला, याचा अर्थच तिथे जनमानसात डाव्यांविषयी किती टोकाची नाराजी मुरलेली होती, त्याची साक्ष मिळते. त्यातला पराभव ओळखता आला तर त्याचा सामना करता येईल.

गावस्करच्या जमान्यात पाकिस्तानचा धडाडीचा गोलंदाज इम्रान खान याने भारताची त्रुटी नेमकी मांडली होती. भारतापाशी चांगले भेदक गोलंदाज नाहीत. म्हणून अन्य कुठल्या संघातल्या फ़लंदाजीला ते आटोपू शकत नाहीत. उलट अन्य कुठल्या संघात चांगले गोलंदाज असल्याने ते उत्तम भारतीय फ़लंदाजीलाही भगदाड पाडतात. मग चांगले फ़लंदाज असून भारताची धावसंख्या वाढत नाही, की विरोधी संघाची धावसंख्या रोखता येत नाही. हे भारताच्या पराभवाचे कारण त्याने दाखवले होते. मोदीविरोधी पक्षांची नेमकी तीच लंगडी बाजू आहे. त्यांना पराभवाचे विश्लेषण नको आहे आणि विजेत्याच्या नावाने बोटे मोडण्यातून तो नामोहरम होईल, अशी खुळी आशा विजयाचे स्वप्न दाखवत असते. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी विरोधकांनी मोदींचा विजय विसरून जावे आणि आपल्या पराभवाचा स्विकार करावा. तो केला तर आपल्या चुका व नाकर्तेपणा त्यांना दिसू लागेल. आपोआपच त्यांना ते दोष दूर करण्याची इच्छा होऊ शकेल आणि परिणामी आपल्या पराभवावर मात करण्याची मनिषा त्यांना मोदींच्या विरोधात लढायला सज्ज करू शकेल. विराट जर अशीच दक्षिण आफ़िक्रेच्या नावाने बोटे मोडत बसला असता, तर सर्वच्या सर्व सामने हरूनच मायदेशी परत आला असता. पण त्याने ती चुक केली नाही. त्याने विजेत्याचे यश स्विकारले आणि आपल्या चुकांचा शोध सुरू केला. कॉग्रेसचे दुर्दैव असे आहे, की राहुल गांधी चुकत नाहीत आणि चुकलेच तरी तसे कोणी त्यांना सांगत समजावत नाहीत. तसे केल्यास मोदींचे समर्थन होईल म्हणून अन्य पक्षाचे अर्धवट शहाणेही राहुलच्या मुर्खपणाचे समर्थन करतात आणि मोदींना त्याने कुठलाही फ़रक पडत नाही. कारण असल्या शिव्याशापांनी मेहनतीवर मात करता येत नाही. कुणाचा विजय हे आपले अपयश आहे, याचे भान नसेल तर मोदींच्या अश्वमेधी घोड्याला कोण अडवू शकणार आहे?