fbpx

निराधारांनी ६०० रुपयांत महिना कसा घालवायचा? खा. नवनीत कौर राणा गरजल्या

टीम महाराष्ट्र देशा : संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अमरावतीच्या खा. नवनीत कौर राणा यांनी श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तुटपुंज्या भत्त्याचा मुद्दा उचलून धरला आहे. देशातील निराधारांना श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून २०० रुपये आणि राज्य सरकारकडून ४०० रुपये महिना मिळतो . मात्र, देशातील सध्याची वाढती महागाई पाहता सहाशे रुपये महिन्यात या निराधार व गरजू-गरिबांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न खा. राणा यांनी सरकारला विचारला आहे.

या वेळी खा. राणांच्या बरोबर अनेक नेत्यांनी हाच सवाल सत्तधारी सरकारला विचारला आहे. राणा म्हणाल्या की, देशातील निराधारांना राज्य सरकारचे ४०० आणि केंद्राचे २०० असे मिळून केवळ ६०० रुपये भत्ता देण्यात येतो. मात्र, आजमितीला आपण चहा प्यायला गेलो तरी, २० रुपये लागतात. मग, या निराधारांनी ६०० रुपयांत महिना कसा घालवायचा? असा प्रश्न राणा  यांनी उपस्थित केला. तसेच, निराधार, अंध-अपंग, बेरोजगारांना केंद्र सरकारने किमान २ हजार रुपये महिना भत्ता द्यावा, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली.

तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही गरीबांसाठी घरकूल योजनेचा लाभ मिळायला हवा. महाराष्ट्राला केवळ ७ लाख घरकूल योजनेचे  लक्ष्य देण्यात आले आहे. पण, योजना ही २० ते २५ लाख घरकुलाची मंजूर करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.