कसा असावा पावसाळ्यातील आहार

वेबटीम : सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून आपल्याला गरमागरम खमंग भजी व वाफाळणारा चहा घेण्याची या दिवसांत थोडी जास्तच आवड असते.   पण याच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाताचा प्रकोप झालेला असतो त्यामुळे पचनक्रियाही मंदावलेली असते. यामुळे पावसाचा आनंद लुटण्याच्या  नादात उगाचच आबरट चाबरट खावून तब्येत बिघडवून घेवू नये.

पावसाळ्यात कसा ठेवावा आहार

पचनशक्ती मंदावल्याने भुकेवर त्याचा परिणाम होतो. म्हणून पावसाळ्यात दिवसाची सुरूवात ही एक ग्लास गरम पाणी पिऊन करावी. नाश्तामध्ये पोहे, उपमा, थालीपीठ, दशमी घ्यावी. तर दुपारच्या जेवणात मुगाचे वरणं, मसूराची उडदाची आमटी, कुळीथ, चवळी, दोडक्याची भाजी, घोसाळे, श्रावणीघेवडा, पडवळ, दूधी, वांगी, भात, चपाती, सलाड असा आहार घ्यावा. रात्री शक्यतो हलका आहार घ्यावा. या दिवसात कडधान्य खाणे टाळलेले बरे. तसेच पावसात भाज्या सडत असल्याने त्याही टाळाव्यात. पावटा, मटार, छोले वर्ज्य करावेत. जेवणात जिरेपुड, सुंठ, लवंग, पुदीना यांचा अधिक वापर करावा.

वातावरणातील बदलामुळे या दिवसात सर्दीपडसे. ताप, खोकला होत असतो. यासाठी घरगुती काढे उपयुक्त असतात.

सर्दी पडसे झाल्यास.काढा : २ कप पाण्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचुन घालावा. पाण्यात तुळस, पुदिन्याचि पाने प्रत्येकी ५-६ पाने, गवतीचहाचे एक पान बारीक चिरुन घालावे. २ मिरे, दालचिनीचा छोटा तुकडा घालावा व चवीसाठी गुळाचा लहानसा खडा घालावा. पाण्याला चांगली उकळी आली की झाकण ठेऊन गॅस बंद करावा. ५ मिनिटात काढा तयार.

खोकला झाल्यास सुंठ दूध : १ कप दूध उकळावे. उकळल्यानंतर त्यात पाव चमचा हळद आणि पाव चमचा सुंठ पूड किंवा किसलेले आले घालावे. अगदी आवश्यक असल्यास अर्धा चमचा साखर घालावी. झोपायच्या आधी गरम असताना घोट घोट प्यावे.