फेसबुकवरील फेक अकाउंट कसे ओळखायचे?

facebook paid subscription

वेब टीम- हल्ली आपली ओळख लपवून चर्चा करण्यासाठी किंवा इतरही अनेक कारणांसाठी लोक फेसबुकवर फेक अकौंट काढतात. चुकीची माहिती पसरवणे, अपप्रचार करणे वगैरे अशा अनेक गोष्टी अशा खात्यांच्या माध्यमातून केल्या जात असतात. हे अकाउंट कुणाचे आहे हे सहसा ओळखू येत नाही. म्हणून असे हे फेक अकाउंट ओळखायचे असतील तर काही युक्त्या मात्र आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात…

1)  प्रोफाईल चेक करा : जर तुम्हाला एखादे अकाउंट फेक असल्याचा संशय असेल तर एक युक्ती करा. फेक अकाउंट काढणारी व्यक्ती कधीच स्वतःचा फोटो प्रोफाईलला लावत नाही. तो दुसऱ्याच कुणाचा तरी असतो. अशा वेळी एक युक्ती करा.

तो फोटो तुमच्याकडे सेव्ह करा. गुगलवर जाऊन गुगल इमेजेसवर क्लिक करा. तिथे बाजूला एक कॅमेराचे चित्र दिसेल. आता त्यावर क्लिक करून तुम्ही सेव्ह केलेला फोटो तिथे अपलोड करा आणि गुगल सर्च करा. आता त्या फोटोबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तो फोटो कुणाचा आहे हे ही कळेल. यावरून तुम्ही ते अकाउंट फेक आहे की नाही याचा अंदाज लावू शकता.

2) टाईमलाईन चेक करा : फेसबुकची टाईमलाईन लक्ष देऊन वाचल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात येतील. ती व्यक्ती कोणत्या पोस्ट टाकते यावरून तुम्ही तिच्याबद्दल अंदाज लावू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे अनेकदा फेक अकाउंट तयार करणारा पुरुष असेल तर तो नजरचुकीने त्याचेच लिंग त्या अकाउंटला टाकतो. त्या व्यक्तीच्या माहितीमध्ये तुम्हाला हे दिसून येईल.

एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधायला येते तेव्हा तिच्यावर विशेष लक्ष द्या. म्हणजे ती व्यक्ती तुमच्याशी प्रमाणापेक्षा जास्त बोलत असेल, किंवा तुम्ही तुमच्याबद्दलच्या तिला न सांगितलेल्या गोष्टी तिला माहित असतील तर ती व्यक्ती तुम्ही ओळखत असलेल्या व्यक्तींपैकी आहे.

3) नंबर किंवा मेल आयडी चेक करा : फेसबुकवर अकाउंट उघडताना आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा मेल आयडी विचारला जातो. तो दिल्यानंतर आपण तीच व्यक्ती आहोत ही खात्री पटावी म्हणून नंबरवर किंवा मेल द्वारे एक वन टाईम पासवर्ड पाठवून त्याद्वारे ओळख नक्की केली जाते. फेक अकाउंट उघडणारी व्यक्ती नवखी असेल तर ती आपला नेहमीचा नंबर किंवा मेल आयडी फेसबुकला देते. ही माहिती तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर दिसते. त्यावरून तुम्ही ती व्यक्ती नक्की कोण आहे हे ओळखू शकता.

वरील सगळ्या पद्धतींनी ते अकाउंट नक्की कुणाचे आहे याचा अंदाज फक्त बांधता येतो. पण हीच ती व्यक्ती आहे असे ठामपणे सांगता येत नाही.