सांगलीचा वंचित बहुजन आघाडीचा कोट्याधीश उमेदवार वंचित कसा ?

टीम महाराष्ट्र देशा– वंचित आणि शोषितांना न्याय देण्याचा उदात्त हेतू समोर ठेवून भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएनचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र या आघाडीच्या नावाखाली धनाड्य लोकांचाच उत्कर्ष होतोय कि काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सांगली लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच त्यांनी आपल्या संपत्तीबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. पडळकर यांनी दिलेली माहिती समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शेतकरी असल्याचे सांगणाऱ्या पडळकर यांची 1 कोटी 2 लाख रुपये संपत्ती आहे. गेल्या काही वर्षांत 60 लाखांची स्थावर मालमत्ता आणि 24 लाख रुपयांची चारचाकी गाडी खरेदी केली आहे. पडळकर यांनी 95 हजार रुपयांची रोख रक्कम दाखवली आहे. विविध बँकांत 17 हजार रुपयांची ठेव आहे.

2013 मध्ये चोवीस लाख रुपयाची चारचाकी गाडी खरेदी केली आहे. त्यांच्याकडे साठ हजार रुपयांचे 20 गॅ्रम सोन्याचे दागिने आहेत. पिंपरी बुद्रूक (ता. आटपाडी) येथे दहा लाखांची साडेतीन एकर जमीन, झरे येथे पंचवीस लाखांची 6 एकर शेतजमीन आहे.

बिगर शेतजमीन विटा येथे 28 लाख रुपयांची आहे. पडळकरवाडी येथे 3 लाख आणि झरे येथे 7 लाख रुपयांचे घर आहे. पडळकर यांचे शिक्षण बारावी आहे. ते सध्या शेती करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत आयकर विवरण पत्र भरलेले नाही.

निवडणुकीचा प्रचार करताना ते आपण किती सामान्य घरातून आलो आणि वंचित जनतेला न्याय कसा मिळवून देणार याबद्दल बोलत असतात. मात्र कोट्यावधी रुपयांची संपत्ती असलेला उमेदवार हा वंचित कसा असू शकतो असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे पडळकर याना उमेदवारी देताना वंचित बहुजन आघाडीने आपले मुलभूत सिद्धांत बाजूला ठेवल्याचा आरोप होऊ लागला आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU&t=762s