शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने किती दखल घेतली ? आदित्य ठाकरेंचा सवाल

aditya thakre vs narendra modi

कल्याण : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल झाले आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत रॅली काढत मुंबईत पोहोचले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, इतर शेतकरी संघटनांचे नेते व मंत्री हजर राहिले असतानाच शिवसेनेच्या एकाही नेत्याने वा मंत्र्याने या मोर्चाला हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा या आंदोलनाला शाब्दिक पाठींबा असला तरी प्रत्यक्षरित्या शिवसेनेचा सहभाग या आंदोलनात नसल्याचं समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वा इतर शिवसेनेचे मंत्री हे या आंदोलनातील सभेला हजर राहतील अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी हजेरी न लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा या किसान सभेच्या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगत शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने किती दखल घेतली, असा सवाल केला आहे. तर, ‘किसान मोर्चाच्या इथे कोणी फिरकलं नाही. यापेक्षा केंद्राने गेल्या ६० दिवसांच्या आंदोलनाची किती दखल घेतली आहे. याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेतृत्व करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल बोलले आहेत,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्धाटनानंतर आदित्य ठाकरे बोलत होते. या शेतकऱ्यांच्या मोर्चेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, ६० दिवस झाले तरी केंद्राने याची दखल घेतलेली नाही, हा प्रश्न आपण विचारायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत .जेव्हा मोर्चे येतात, तेव्हा मास्क घालणे गरजेचे आहे. कारण, अजून कोरोना संपलेला नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या