सचिनने किती मॅच फिक्स केल्या हे न पाहताच त्याला भारतरत्न दिलं गेलं,राजू शेट्टींची मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत साताऱ्याचा संघ मैदानात उतरणार आहे. यशवंत सातारा संघाचा एक कार्यक्रम २९ ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील गोळेश्वर या गावी पार पडला. यावेळी बोलत असताना राजू शेट्टी यांनी, “भलत्या-सलत्यांचा सन्मान केला जातो. सचिनने किती धावा काढल्या व किती मॅचफिक्सींग केलं हे न पाहताच त्याला भारतरत्न दिलं गेलं,” असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

तेंडुलकरबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून मुक्ताफळे उधळल्याने शेट्टी टीकेचे धनी बनले आहेत. खाशाबा जाधवांचा सन्मान झाला नाही हे सांगण्यासाठी सचिनवर जे शेट्टी यांनी आरोप केले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी ?
“खाशाबा जाधवांचा सन्मान करण्यात केंद्र व राज्य सरकार कमी पडले आहे. भलत्या, सलत्यांचा सन्मान केला जातो. सचिन तेंडूलकरने धावा किती काढल्या व किती मॅचफिक्सिंग केले, हे न पाहता त्याला भारतरत्न दिला जातो. खाशाबा हे सचिनपेक्षा तसूभरही कमी नव्हते. मात्र केवळ खेड्यातून असल्यामुळे खाशाबांवर अन्याय झाला का सामन्य जनतेच्या मनात प्रश्न आहे. खाशाबा जाधवांना पद्मभूषण मिळवण्यासाठी दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या काळात तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरंम यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी दोन ओळीच्या पत्रात सांगितले की, हयात नसणाऱ्या व्यक्तीस असला पुरस्कार दिला जात नाही. शासन दरबारी खाशाबा जाधवांच्या सन्मानासाठी लढाई सुरु ठेवणार आहे.”