जाणून घ्या सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नेमके काय केले होते आरोप ?

टीम महाराष्ट्र देशा – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. या विरोधाची गंभीर दखल घेत भाजपने सोमय्या यांचा या मतदारसंघातून पत्ता कट केला आहे. आता ईशान्य मुंबईतून भाजप- सेनेचा उमेदवार म्हणून भाजपच्या मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मध्यंतरी शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरु असताना सोमय्या यांनी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. पुढे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सेनेसोबत जुळवून घेतले मात्र सोमय्या यांच्या आरोपांमुळे दुखावलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना टोकाचा विरोध केला. अखेर तोंडघशी पडलेल्या सोमय्या यांचं तिकीट कापले गेले. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सोमय्या यांनी नेमके काय केले होते आरोप ?

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ही वेळ साधून मित्रपक्ष शिवसेनेवर टीका केली होती. ‘गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपा पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना…’ अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

काळ्या पैसा पांढरा करणारा चंदू पटेल सध्या जेलमध्ये आहे त्याच्याबरोबरचे संबंध, व्यवहार उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे, असं थेट आव्हान सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. बाळासाहेबांच्या नावावर एक संपत्ती नव्हती. पण मेहुणा, पीए, उद्धवचं तसं नाहीये, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावावरील कंपन्यांची माहिती उघड करावी, असं म्हणतं किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होतं. मीरा-भाईंदरमधील मतदारांनी नरेंद्र मोदींच्या माफीया हटाव आणि मुख्यमंत्र्यांच्या विकासला मत दिल असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.मुंबईत 84 जागा जिंकल्यानंतरही शिवसेनेची माफीयागिरी संपली नव्हती. मीरा भाईंदरचा निकाल हा शिवसेनेसाठी सणसणीत चपराक आहे. शिवसेना नेत्यांच्या अहंकाराला मतदारांनी जागा दाखवली आहे असे किरीट सोमय्या म्हणाले होते. मीरा-भाईंदरच्या निकालानंतर तरी बांद्रा सुप्रीमो वास्तव स्वीकारुन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा मान ठेवणार का ? असे टि्वट सोमय्या यांनी केले आहे.

शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडले त्यावेळी देखील सोमय्या यांनी सेनेवर गंभीर आरोप केले होते. फुटलेल्या नगरसेवकांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडलाय असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला होता.सोमय्या फक्त आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी एसीबी आणि ईडीकडे तक्रार केली. पुष्कक बुलियन या कंपनीचे चंद्रकांत पटेल यांच्यामार्फत हा व्यवहार झाला, असा आरोपही त्यांनी केला होता.