‘अशी’ मागणी करणाऱ्या शिवसेनेला ‘लाज’ कशी वाटत नाही ? – खासदार इम्तियाज जलील

टीम महाराष्ट्र देशा : ‘संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. आधी पुढील ४ वर्षात शहराचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ.’ असे एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबतच्या मुद्द्यावर  मोठी भूमिका स्पष्ट केला आहे. तसेच त्यांनी मनसे आणि शिवसेनेला आधी शहराच्या विकासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, ‘औरंगाबादमधील सामान्य लोकांना, तसेच इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा शहराचं नाव बदलायचं की विकास करायचा. छत्रपती संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. मात्र, त्यांनी आधी पुढील ४ वर्षांमध्ये शहराचा विकास करावा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्यावा. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ. तुम्ही जर कचरामुक्त शहर केलं, तर मी स्वत: संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन. फक्त नाव बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, ‘शहराचं नाव बदलण्याची मागणी लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे असते, तर ते माझ्या नावानं स्मारक बांधू नका, तर मोठं हॉस्पिटल बांधा, असं म्हणाले असते. भावनिक मुद्दे तयार करुन हे राजकारण करत आहेत. खैरेंना काही काम उरलेलं नाही. म्हणून ते हे मुद्दे पुढे करत आहेत. तुमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळं तुम्हाला जे करायचे ते करा.

गेल्या ३२ वर्षांपासून मी ऐकत आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार आहे. निवडणुका जशा जशा येतात तसे हे मुद्दे उपस्थित केले जातात. आता महानगर पालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळेच नामांतराची पुन्हा मागणी होणार हे २०० टक्के जनतेला माहिती होतं.

कचरा, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे आहेत, पण यावर तुम्ही बोलणार नाही. ज्यांना काही कामं उरली नाहीत तेच असे मुद्दे उपस्थित करतात, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. हा लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली .

लाज नाही वाटत का ? – खासदार इम्तियाज जलील

शिवसेनेच्या नामांतराच्या मागणीचा समाचार घेताना एम.आय.एम. खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ज्या शहराची ओळख तुम्ही कचऱ्यामुळे केली आहे. छत्रपती संभाजी महाराज महान राजे होते. अशा कचरा प्रश्नी कुप्रसिद्ध शहराला छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान राजांचं नाव देण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला लाज कशी वाटत नाही ? तुमच्याकडे राज्यात अजून चार वर्ष सत्ता आहे . असा संकल्प करा की चार वर्षात औरंगाबाद शहर देशातील चांगलं शहर करू. नंतर आम्ही  नामांतरासाठी तुमच्या सोबत येऊ. असं आश्वासनही जलील यांनी दिलं आहे.

हेही पहा –