…जेव्हा धनंजय मुंडेंंनी पहिल्यांदा दिला होता परळीतच गोपीनाथ मुंडेंना धोबीपछाड

gopinath munde and dhananjay munde

अभिजीत दराडे : मुंबईत मातोश्री बंगल्यावर वर एका काका पुतण्याची लढाई महाराष्ट्र पाहत होता. आतापर्यंत राज्यात दुसरी काका पुतण्याची लढाई सुरु झाली होती ती यशश्री बंगल्यावर… तारीख होती २६ डिसेंबर २०११, परळीत नगराध्यक्षपदाची निवडणूक होती. या निवडणुकीत काका गोपीनाथ मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी धोबीपछाड दिला होता. याची प्रचीती २४ डिसेंबरलाच आली होती कारण साता-यात धनंजय मुंडे यांचे भाजप समर्थक नगरसेवक क्रिकेट खेळण्यात दंग होते.

या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी होती जुगलकिशोर लोहिया यांना तर धनंजय मुंडे यांच्या गटाने दीपक देशमुख यांना उमेदवारी दिली होती, तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील फड यांना उमेदवारी दिली होती. बंडखोर धनंजय मुंडे यांच्या गटाने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही जागेवर विजय मिळवला होता. या दोघांनाही २६ मत मिळाली तर काका गोपीनाथ मुंडे गटाच्या जुगलकिशोर लोहिया यांना अवघे ६ मते मिळाली.

आजपर्यंत गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत वाढलेल्या भाजपच्या ११ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलत धनंजय मुंडेंच्या उमेदवाराला मत दिले होते. गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षमय कारकिर्दीतील हा सगळ्यात जिव्हारी लागणारा पराभव म्हणून पाहिला गेला.

हा पराभव गोपीनाथ मुंडे यांच्या इतका जिव्हारी लागला की पराभवानंतर गोपीनाथ मुंडे यांनी उद्विग्न होऊन धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड करत. “मी ज्यांना मोठे केले. तेच माझ्यावर उलटले आहेत. माझ्याच माणसांनी माझ्या डोक्यात धोंडा घातला आहे. तो आता दुसऱ्यांचा काय होणार ”? असे उद्गार काढले होते.

त्यावेळी एक कविता चांगलीच गाजली होती,
काका कोणताही असो त्यावर प्रसंग बाका आहे
काकाला पुतण्यापासून हमखास धोका आहे
हातच्या कंकणाला आरसा कशाला ?
पुतणे विचारू लागले
वारशासाठी मुलगा  / मुलगीच कशाला ?

त्यानंतर १९ जानेवारी २०१२ मध्ये धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासूनच राज्यात मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष राज्याच्या समोर आला.

आता मुंडे विरुद्ध मुंडे लढाईतील पुढचा भाग बीड-लातूर-उस्मानाबाद येथील विधानपरिषद निवडणुकीच्या रूपाने पुढे आला आहे. भाजपचे रमेश कराड यांना गळाला लाऊन धनंजय मुंडे यांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देत पंकजा मुंडेंवर कुरघोडी केली मात्र पंकजा यांनी ‘नेहेले पे देहला’ देत ऐन वेळेस रमेश कराड यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले. आता २०११ मध्ये परळी नगरपरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बंडखोरी करत बाजी मारली होती.

मात्र, आतापर्यंत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. तेव्हाचे सुरेश धस आता पंकजा मुंडेंच्या जवळचे होऊन विधानपरिषदेचे उमेदवार झाले आहेत. सत्ता सुद्धा बदलली आहे. त्यामुळे मुंडे विरुद्ध मुंडे लढाईने पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की धनंजय मुंडे काकांविरोधात लढलेल्या आपल्या पहिल्या विजयची पुनरावृत्ती करतात की यावेळेस बहिण पंकजा मुंडे बाजी मारतात ?