‘खूपच हुशार कमिशनर आहेत, लॉकडाऊनमध्ये ट्रॅफिक जाम होईलच कसं ?’; राणेंचा सवाल

nilesh rane vs iqbal chahal

मुंबई : मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये हीच स्थिती असल्याने पुन्हा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

तब्बल १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन दिवसातच या दाव्यावर पाणी फेरले आहे. तर, भाजप नेत्यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आता मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावर स्पष्टीकरण केलं आहे.

‘मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. आपल्याकडे ड्रेनेजची कॅरिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्यात अधिक पाऊस झाल्याने काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच,’ असं म्हणत आयुक्त चहल यांनी पावसावरच दोष टाकला आहे. तर, हिंदमातामध्ये गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी झाली नाही. हिंदमाता येथे आपण काम केल्याने अडीच फुटापर्यंत पाणी साचूनही वाहतूक कोंडी झाली नाही. यासोबतच मुंबईत दहिसर सबवे, सायन रेल्वे ट्रॅक आणि चुनाभट्टी ट्रॅक हे तीन पॉईंट वगळता मुंबईत कुठेही रोड आणि लोकल वाहतूक बाधित झाली नाही, असा दावा देखील इकबाल चहल यांनी केलाय.

चहल यांच्या या दाव्यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. लॉकडाऊन सुरु असताना ट्रॅफिक जाम कसं होईल ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘खूपच हुशार कमिशनर आहेत मुंबई शहराचे. लॉकडाऊन चालू असताना सांगतायत ट्रॅफिक जॅम झाला नाही, काय म्हणावं कमिशनर साहेबांना. लोकं त्या प्रमाणात बाहेर पडलीच नाही तर ट्रॅफिक जॅम कसलं??? मुंबईची लोकं सहनशील आहेत, त्यांना सवय झाली आहे म्हणून काही बोला चालेल,’ असा संताप देखील राणे यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या

IMP