कोकण पदवीधर मतदारसंघात ‘असा’ मिळवला भाजपने विजय

कोकण पदवीधर मतदारसंघाचा ग्राउंड झिरो वरून आढावा..!

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : काल मुंबई शिक्षक-पदवीधर सह कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. मतपत्रिकांच्या साह्याने हे मतदान पार पाडत असल्याने मतमोजणीला खूप वेळ लागतो. कोकण पदवीधर सारखा मोठ्या मतांच्या मतदारसंघाचा निकाल जाहीर व्हायला तर आजची सकाळ उजाडली. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या वाट्याला २ जागा तर भाजप व लोकभारतीचे कपिल पाटील यांना प्रत्येकी १ जागा मिळाली. अत्यंत चुरशीच्या लढाया इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यातील कोकण पदवीधर मतदारसंघांचा आज ग्राउंड झिरो वरून आढावा…

गुजरातच्या सीमेवरून थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पसरलेला पालघर ते सिंधुदुर्ग इतका विस्तीर्ण हा मतदारसंघ. या कोकण पदवीधर मतदारसंघावर पूर्वी पासून भाजपची पकड होती. मागील निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्याच रूपाने राष्ट्रवादीने आपला झेंडा प्रथमतः यावर रोवला. निरंजन डावखरे यांचे वडील स्व.वसंत डावखरे यांचे सेनेसह सर्वच पक्षांशी असलेले उत्तम संबंध त्यावेळी कामाला आले होते. सर्वांनीच मदत केल्याने भाजपची पकड असलेल्या या मतदारसंघाला निरंजन यांच्या रूपाने डावखरेंनी सुरुंग लावला होता. परंतु काही महिन्यांपूर्वी वसंतराव गेल्याने निरंजन यांनी अवघ्या काही दिवसातच भाजपचा रस्ता धरला.

niranjan davkhare

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व निरंजन यांच्यातला राजकीय कलह व त्याने अस्थिर वाटू लागलेली भावी आमदारकी निरंजन यांना भाजपात घेऊन गेली. तर भाजपचे पदवीधरचे माजी आमदार संजय केळकर ठाणे शहर मधून विधानसभेवर गेल्यामुळे संदीप लेले तिथून लढण्यास इच्छूक होते परंतु निरंजन यांच्या इंकमिंगमुळे त्यांच्या स्वप्नांना धक्का लागला.
त्यात शिवसेनेने पालघरच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी व आपली कोकणात असणारी मोठी संघटन ताकद वापरून ही जागा बळकविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार व ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिली. तर दुखावलेल्या राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली. त्यांच्या रूपाने डावखरेंचा पाठीराखा असणारा मुस्लिम मतदार दुरावला जाईल, असा राष्ट्रवादीचा कयास होता तसेच नजीब हे सर्वच बाबतीत तगडे असल्याने त्यांना वाढता प्रतिसाद मिळेल, असेही वाटत होते.

खऱ्या अर्थाने निरंजन डावखरे भाजपात गेल्याने व शिवसेनेचे उमेदवार हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय नजीकचे असल्याने या निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली होती. शरद पवार यांनी वाशीत सभा घेऊन तर स्वतः मुख्यमंत्री यांनी ठाण्यात मेळावा घेऊन , या मतदारसंघाकडे लक्ष दिल्याने ही निवडणूक जबरदस्त अटी-तटीची होणार हे आधीच स्पष्ट होते. या अतिशय अटीतटीच्या सामन्यात जवळपास २३ तासांच्या मतमोजणी नंतर निरंजन डावखरे यांचा विजय झाला. या निवडणुकीत सेनेचे संजय मोरे दुसऱ्या तर नजीब मुल्ला हे अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

सेनेकडून फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा किल्ला लढवला. पहिल्यांदाच या मतदारसंघात लढणाऱ्या सेनेला कमी अनुभवासोबतच पदवीधरांची तुलनेत कमी नोंदणी, प्रचारास मिळालेला कमी अवधी, या निवडणुकीचे असणारे वेगळे तंत्र अश्या इतर घटकांचा सुद्धा मार बसला, यामुळे खऱ्या अर्थाने सेनेचा निसटता पराभव झाला.
या उलट निरंजन डावखरे यांचा मागील निवडणुकीचा अनुभव, पदवीधर नोंदणीसाठी वयक्तिक लक्ष घालून मोठया संख्येत नोंदवलेले मतदार, भाजपची पारंपरिक मते, राष्ट्रवादीतील आव्हाड सोडता इतर नेत्यांशी असणारे त्यांचे चांगले संबंध, मागील वर्षांपासून सुरू असणारा नियोजनबद्ध प्रचार अश्या घटकांचा त्यांना फायदा झाला.

भाजपासोबतच वसईच्या बाहुबली हितेंद्र ठाकूरांनी दिलेला सक्रिय पाठिंबा, राणेंच्या स्वाभिमानाचा आणि आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा यांमुळे त्यांना पालघर व सिंधुदुर्गात मोठे बळ मिळाले. त्यात रायगड मधील त्यांच्या जुन्या पक्षातील मोठ्या मातब्बर नेत्याने त्यांना सर्वतोपरी मदत केल्याची कुजबुज देखील राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. या सर्व बाबींचा डावखरेंचे डाव खरे होण्यात हातभार लागला, हे निकालावरून स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला तरुण आणि नवखे व अचानक दिलेले उमेदवार होते. तसेच जितेंद्र आव्हाड सोडता म्हणावे तसे त्यांच्या पक्षांतील इतर मोठ्या नेत्यांनी व मित्रपक्ष शेकापने त्यांना बळ दिले नसल्याने त्यांना जिंकण्याइतपत मजल मारता आली नाही.

या निवडणुकीने निरंजन डावखरे यांच्यासह राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे वजन वाढले असले तरी पहिल्यांदा लढून विजयाच्या समीप पोहचण्यासाठी थोडक्यात मागे पडलेल्या सेनेचे एकनाथ शिंदे यांची संघटनवरील पकड अजून वाढताना दिसून येत आहे. ठाणे-पालघरचा परीघ ओलांडून संपूर्ण कोकणावर त्यांच्या बिनतोड नियोजनाची, संघटन शक्तीची, पक्षासाठी घेत असलेल्या कष्टांची पकड या निमित्ताने प्रस्थापित झाली. सध्या महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा नेत्यांची म्हणून नव्हे तर खऱ्या शिवसैनिकांची म्हणून नावारूपाला येत असल्याने या निवडणुकीतून ती अधिकची उजाळून निघाली आहे. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीतील गटबाजी अजून प्रकर्षाने चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.

जो वडिलांना विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार? शिवसेनेचा निरंजन डावखरेंवर हल्लाबोल

संजय मोरे हे पदवीधरांचे हक्काचे आमदार होणार, खा. श्रीकांत शिंदे यांना ठाम विश्वास

You might also like
Comments
Loading...