बाळासाहेबांचा एक शब्द ‘कमळीची काळजी करू नका’; आणि सुप्रिया सुळे बनल्या बिनविरोध खासदार

पुणे : टोकाचे राजकीय मतभेद असणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यातील स्नेह अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आपल्या विचारधारेवर कायम ठाम राहणारे दोन्ही नेते जनतेच्या प्रश्नांवर अनेकवेळा एकत्र आल्याचही दिसून आलं. काल पुण्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक महामुलाखतीवेळी राज ठाकरे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी याच आठवणींना उजाळा दिला आहे.

राज यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की’ तुमचे काका आणि मी व्यासपीठावरून एकमेकाला काय बोलायचो हे इथे न बोलणे नको. कधी मी त्यांच्यावर टीका करायचो तर कधी ते मला बारामतीचा म्हमद्या. भरलेलं पोत म्हणायचे. मात्र त्यांनी व्यक्तीगत सलोखा कधी सोडला नाही.

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेली गोष्ट सांगितली. ‘सुप्रिया लहान असताना बाळासाहेबांच्या घरी खेळायला जायची. पुढे जेव्हा तिला राज्यसभेची उमेदवारी द्यायचे ठरले त्यावेळी बाळासाहेबांनी मला फोन केला. यावेळी त्यांची भूमिका विचारली. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, आमची मुलगी निवडणूक लढवणार म्हणल्यावर माझी वेगळी भूमिका काय असणार. तुम्ही निश्चित रहा ती बिनविरोध निवडून येईल. यावेळी मी भाजपबद्दल विचारलं. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की ‘तुम्ही कमळीची काळजी’ करु नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरंच सुप्रिया बिनविरोध निवडून आली. पार्लमेंटमध्ये बिनविरोध निवडून येणं सोपं गोष्ठ नव्हती जी घडली.