‘१२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे’

जयंत पाटील

मुंबई  – राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. वारंवार सरकारकडून मागणी करून देखील या नियुक्त्या केल्या जात नसल्याने महाविकास आघाडीतील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्यसरकारने राज्यपालांना आठवण करून दिली आहे त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

काल सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात आणि राज्यात आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा अशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही. राज्य सरकारने एखादी गोष्ट शिफारस केल्यानंतर इतक्या प्रचंड प्रलंबाने त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. इतका विलंब का लागतोय असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला आहे.

आमच्या पध्दतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पाठवल्या आहेत. मात्र प्रलंबित नियुक्त्या राज्यपालाकडून रखडल्या आहेत. राज्यसरकारचा शिफारशी करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला निर्णय न घेतल्यामुळे अधिकारावर गदा येतेय का? हा खरा प्रश्न आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP