औरंगाबादच्या हॉटस्पॉट वसाहती पुन्हा होणार ‘सील’

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची साखळी पसरण्यास सुरूवात झाली आहे. दररोज शंभर ते दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे महापालिकेने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. एखाद्या कॉलनीत अथवा वसाहतीमध्ये वीसपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले तर तो भाग सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

यावरून आता वसाहतींतच लॉकडाऊन लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग औरंगाबादेत सुरू झाल्यानंतर त्यावेळी ज्या वसाहतीत रूग्ण आढळला, तो संपूर्ण भाग सील केला जात होता. पत्रे ठोकून रस्ते बंद केले जात होते. तो भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जात होता. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना घराबाहेरही पडता येत नव्हते. त्यावेळी शहरात सुमारे साडेपाचशे भागात पत्रे ठोकून २८ दिवसांचे निर्बंध लावले होते. मार्च ते ऑगस्ट २०२० पर्यंत कन्टेनमेंट झोन होते. त्यानंतर कन्टेनमेंट झोनच्या नियमात शिथीलता आणण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच रुग्णांची संख्या देखील कमी होत गेली. अनलॉकची प्रक्रिया राबवून मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्याटप्प्याने बाजारपेठांसह सर्व व्यवहार सुरळीत झाले.

दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात कोरोना रुग्णांची ही संख्या २० ते ३० पर्यंत घटल्याने यंत्रणेसह नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता अचानकपणे शहरात कोरोना संसर्ग वाढण्यास सूरूवात झाली आहे. शहराच्या चोहोबाजूंनी रुग्ण आढळून येत आहे. मागील पाच दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा सहाशेपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कठोरपणे उपाययोजना राबविण्याची तयारी सूरू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या