पुणे : होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विविध संघटना आक्रमक

पुणे : शहरातील जुना बाजारजवळील शाहीर अमर शेख चौकात लोखंडी होर्डिंग कोसळून झालेला अपघातामध्ये चार निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. अनेकजण जखमी झाले आहेत, तर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेले पुणे महानगर पालिकेचे अधिकारी, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, रेल्वे अधिकारी, होर्डिंग मालक आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शहरातील सामाजिक संघटनांनी केली आहे.

त्याचबरोबर येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत शहरातील लोखंडी व इलेक्ट्रॉनिक होर्डिंग काढून टाकावेत, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त यांच्याकडे देण्यात आले असून, येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत या मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही, तर आमरण उपोषण आणि उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) वाहतुक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सागर जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली एकूण 12 संघटना एकत्र आल्या आहेत. यामध्ये भारत बहुजन ग्रुप, अखिल बंजारा सेवा संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष (युवक), माथाडी कामगार सेना, दलित पँथर, कैकाडी समाज युवक संघटना, लहुजी शक्तीसेना, ओमसाई प्रतिष्ठान, दिव्य लहुजी सेवा संघटना, सम्यक क्रांती मोर्चा, रिपब्लिकन कामगार सेना, पतित पावन संघटना यांचा समावेश आहे. अजीजभाई शेख, मुकेश शहारे, सागर जाधव, नितीन भालेराव, अतुल कांबळे, समीर राठोड, संदीप सोनवणे, किशोर कांबळे, बाबासाहेब नागटिळे, विराज अवधुते, उमेश कोकरे, किरण जाधव, कृष्णा साळुंके, संदीप सकट स्वप्नील आरणे यांच्या उपस्थितीत हे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना देण्यात आले. दोघांनीही निवेदन स्वीकारुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सागर जाधव यांनी सांगितले आहे.