अहवाल येईपर्यंत हातावर बसणार होम क्वॉरंटाइनचा शिक्का

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने आता अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. चाचण्यांदरम्यान स्वॅब घेऊन तपासणीला पाठवल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंत हातावर शिक्का मारून प्रत्येकाला होम क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आजवर अडीच लाख अ‍ॅन्टीजेन पद्धतीच्या तर दीड लाख आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. हा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे.

याविषयी डॉ. पाडळकर यांनी सांगितले की,पुन्हा किलेअर्क व एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथील कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. त्यासोबतच ज्या कोविड सेंटरच्या जागा पालिकेने परत केल्या आहेत. त्यांना देखील पुन्हा पत्र दिले जाणार आहे. सुमारे ३०० कर्मचारी अद्याप कार्यरत आहेत. ३९ हजार अ‍ॅन्टीजेन तर ११ हजार आरटीपीसीआर किट पालिकेकडे उपलब्ध आहेत.

गरज पडल्यास शासनाकडून कीट पुन्हा प्राप्त होणार आहेत. शहरातील मंगल कार्यालयांसह,सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी ५० च्या वर गर्दी असू नये, असा नियम घालून दिला आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्‍याच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या