महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !

trupti desai vs anil deshmukh

पुणे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. यासाठी दगडांची चूल मांडली गेली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.

हात भाजला तर महिला चारित्र्यहीन आणि भाजला नाही तर चारित्र्य संपन्न असा चुकीचा समज या जातपंचायतींद्वारे लोकांमध्ये निर्माण केला गेला आहे. नाशिक मधील ही घटना असून याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. यावर, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील तीव्र निषेध नोंदवत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान दिलं आहे.

‘पारधी समाजाच्या जातपंचायतीने एका नवऱ्याच्या तक्रारीवरून पत्नी वर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नी चारित्र्यसंपन्न आहे की नाही यासाठी तिला उकळत्या तेलात हात घालायला लावला आणि तो व्हिडिओ निर्लज्जपणे नवऱ्याने व्हायरल ही केला. या घटनेमुळे आता महिला असुरक्षित आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे, हे पुन्हा एकदा या प्रकरणातून समोर आले आहे.’ असं भाष्य तृप्ती देसाई यांनी केलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘या जातपंचायती मधील महिलेला शिक्षा देणाऱ्या सर्वांवर आणि तिच्या नवऱ्यावर कठोर कारवाई करा. फुले-शाहू-आंबेडकरांना असा महाराष्ट्र अभिप्रेत नाही. महाराष्ट्र हे “कायद्याचे राज्य” आहे, हे गृहमंत्रीसाहेब आता या सर्वांवर कठोर कारवाई करून दाखवून द्या आणि त्या महिलेला न्याय द्या,’ असं आव्हान तृप्ती देसाई यांनी अनिल देशमुख यांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या