गृहराज्यमंत्र्यांना हाकला; पक्षातूनच उमटले सूर

संजय धोत्रे यांनी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा १५ दिवसांत आपली भूमिका जाहीर करु, असा इशारा दिला.

अकोला: भाजपने पक्षांतर्गत वादाची सीमा पार केली आहे. सोलापूर महापालिकेत तयार झालेले दोन गट ‘पालकमंत्री’ गट आणि ‘सहकारमंत्री’ गट. तसेच नाशिक शहरातील भाजप आमदारांच एकमेकांत जमत नसल्याच स्पष्ट झाल होत. त्यानंतर आता पुन्हा विदर्भातील अकोल्यातील खासदार संजय धोत्रे यांनी पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग करुन अकोल्याचा बिहार केल्याचा आरोप केला आहे.

खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्यातील वादामुळे राजकीय बंड होण्याची शक्यता आहे. या दोन नेत्यांमध्ये आतापर्यंत बरेच छोटे मोठे वाद झाले. मात्र आता संजय धोत्रे यांनी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा १५ दिवसांत आपली भूमिका जाहीर करु, असा इशारा दिला. त्यामुळे नवीन पक्षांतर्गत राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्हा भाजपात खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांचे दोन गट आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाही. खासदार संजय धोत्रे यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत आपण शांत बसलो, मात्र आता थेट मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात दाद मागितल्याचे धोत्रे म्हणाले. आता अकोला भाजपातील संघर्ष पुढच्या काही दिवसांत आणखी तीव्र होणाची शक्यता आहे.

भाजप पक्षाला वादाच ग्रहण लागलं अस म्हणायला हरकत नाही. कारण यापूर्वी स्वपक्षीयांवर तोफ डागून नाना पटोले यांनी भाजपला आणि खासदारकीला रामराम ठोकला होता.
रणजीत पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन अकोल्याचा बिहार केल्याचा धोत्रे यांनी केला आहे.

खासदार धोत्रे आणि पालकमंत्री पाटील यांच्यात अंतर्गत वाद तर बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. पण हा वाद चिघळला एका ग्रामपंचायत निवडणुकीमुळे घुंगशी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाटील गटाचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला. घुंगशी गाव हे रणजीत पाटलांच मूळ गाव त्यामुळे पालकमंत्र्यांना हा पराभव जिव्हारी गेल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीनंतर रणजीत पाटील यांच्या निकटवर्तीयानी विरोधी गटाच्या घरात शिरून त्यांना मारहाण केली. तसेच एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हे दाखल का केले नाहीत? याचा जाब विचारायला खासदार धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेतली.