टीम महाराष्ट्र देशा : कुलदीप यादवचे सहा बळी आणि रोहित शर्माच्या नेत्रदीपक शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडने भारतापुढे 269 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले ते रोहितच्या दिमाखदार शतकामुळे रोहितने 114 चेंडूंत 15 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 137 धावांची दमदार खेळी साकारली. रोहितने संघालाही सलग दुसरा विजय मिळवून दिला.
‘चायनामन’ कुलदीप यादवच्या (6/25) भेदक फिरकीनंतर ‘हीटमॅन’ रोहित शर्माने (137*) झळकावलेले तडाखेबंद नाबाद शतक या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडचा 8 गड्यांनी धुव्वा उडवला. यानंतर भारताने 40.1 षटकातंच केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 269 धावा काढल्या.
ट्रेनट ब्रीज स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना रोहित – शिखर धवन यांनी अर्धशतकी सलामी देत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. टी -20 मालिकेत लौकिकास साजेशी कामगिरी करु न शकलेला धवन चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, मोइन अलीला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने 27 चेंडूत 8 चौकारांसह 40 धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहितसह भारताला मजबूत स्थितीत आणले.
रोहित – कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 167 धावांची निर्णायक भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. कोहलीने 82 चेंडूत 7 चौकारांसह 75 धावा केल्या. रोहितने टी-20 मालिकेतील फॉर्म कायम ठेवत इंग्लंडवर वर्चस्व राखले. संथ सुरुवात करत रोहितने जम बसवला. त्यानंतर त्याला रोखणे इंग्लंडला शक्य झाले नाही. रोहितने 114 चेंडूत 15 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 137 धावा फटकावल्या. तत्पूर्वी, आक्रमक सुरुवात केलेल्या इंग्लंडची कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे घसरगुंडी उडाली. कुलदीपने केवळ 25 धावांत 6 बळी घेत इंग्लंडला रोखण्यात मोलाचे योगदान दिले. कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजीची दाणदाण उडाली. त्याने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टॉ व जो रुट या आघाडीच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद केल्याने इंग्लंडचा डाव 4 बाद 105 असा घसरला. बेन स्टोक्स, जोस बटलर यांनी 93 धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. मात्र, कुलदीपने बटलरला बाद केले. त्याने 51 चेंडूत 5 चौकारांसह 53 धावा केल्या. यानंतर लगेच स्टोक्स व डेव्हिड विली (1) कुलदीपचे बळी ठरले. स्टोक्सने 103 चेंडूत 2 चौकारांसह 50 धावा केल्या.
कुलदीपने 6 बळी घेत इंग्लंडची भक्कम फलंदाजी उध्वस्त केली. उमेश यादवनेही 2 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. कुलदीपने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 किंवा त्याहून अधिक बळी घेतले. इंग्लंडमध्ये 6 बळी घेणारा तो पहिला फिरकीपटू तसेच एकदिवसीय सामन्यात 6 बळी घेणारा तो आठवा भारतीयही ठरला.
1 Comment