fbpx

हिटमॅनचा धडाका सुरूच; माहीचा ‘हा’ विक्रम मोडला

लंडन : टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमधला लागोपाठ दुसरा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ३६ रननी विजय झाला आहे. ३५३ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ५० ओव्हरमध्ये ३१६ रनवर ऑल आऊट झाला. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची माने जिंकणाऱ्या रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहितने ३ चौकार आणि २ षटकारासह ७० चेंडूत ५७ धावा केल्या. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने धोनीला मागे सारत चौथे स्थान पटकावले आहे. धोनीच्या नावावर सध्या ३५४ तर रोहितच्या नावावर ३५५ षटकार जमा आहेत.

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ५२० षटकारांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. शाहिद आफ्रिदी ४७६ तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम ३९८ षटकारांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.