साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात लोकसभेला लढणार ‘हा’ पठ्या !

टीम महाराष्ट्र देश – लोकसभेची आगामी निवडणूक जवळ आली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजे भोसले हेच उमेदवार निश्चित मानले जात आहेत. तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सध्या जोरात चालू झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील भाजपचे नेते व ख़ंडाळा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम जाधव हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले पाहवयास मिळत आहेत. सध्या कराड- पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गाठी- भेटी घेवून बैठकांचे नियोजन केले जात आहे. जाधव हेच उदयनराजेंच्या विरोधात लोकसभेला उभे राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाधव जोरदार तयारी करत आहेत.

पुरूषोत्तम जाधव यांचे समर्थक सध्या तिकीट मिळाले म्हणूनच कामाला लागलेले दिसत आहेत. राष्ट्रवादीतून उदयनराजे भोसले यांची तिसऱ्यांदा उमेदवारी निश्चित होणार हे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे साताऱ्यातून भाजपचाउमेदवार कोण ? अशावेळी केवळ पुरूषोत्तम जाधव यांचे एकमेव नांव हे भाजपाकडे असल्याचे दिसत आहे.

पुरूषोत्तम जाधव यांनी यापूर्वीच वाई, खंडाळा, सातारा, कोरेगांव भागात आपला संपर्क ठेवला आहे. तसेच 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 2,35,068 मते ही शिवसेनेकडून घेतलेली होती. तर नंतर 2014 साली अपक्ष असतानाही 1,55,937 इतकी मते मिळविली होती. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचा अनुभव आणि मिळालेली मते यांचा विचार करता यंदा भाजप किंवा शिवसेनाही पुरूषोत्तम जाधव यांनाच उमेदवारी देवू शकते, त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी ही उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर सुरू केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. मात्र सध्या शिवसेनेकडून कोणीही निवडणुकीची तयारीला लागले दिसत नाही. तसेच युती होईल असे वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत शिवसेनच्या तिकिटावर लढलेले व सध्या भाजपमध्ये असलेले पुरूषोत्तम जाधव एकटेच सातारा लोकसभेला लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.