त्यांच्या प्रेमाला मिळाली पोलिसांची साथ, अन शेवटी बांधली रेशीमगाठ!

औरंगाबाद : करमाड येथील मुलगी आणि पळशी येथील मुलगा या प्रेमी युगुलाने घरच्यांचा होत असलेला विरोध पाहता पळून जाऊन लग्न करण्यात प्रयत्न केला. मात्र करमाड पोलिसांनी सामंजस्याने दोघांच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले. आणि पुढील संघर्ष टाळला गेला. त्यांच्या या पुढाकारासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी देखील पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस अंमलदार आनंद घाटेश्वर यांचे कौतुक करून अभिनंदनासह त्यांना बक्षीसही जाहिर केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, करमाड येथील राहणारी राजश्री आणि पळशी येथील राहणारा रमेश ( नाव बदलले आहे ) दोघांचेही एकमेकावर जिवापाड प्रेम होते. दोघेही सुशिक्षित व सज्ञान असल्याने लग्न करून संसार करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु एकाच जातीचे असुनही दोघांच्याही घरातुन लग्नाला विरोध होऊ शकतो, या कल्पनेतुन दोघांनीही पळुन जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला.

यावरून मंगळवारी (दि.६) करमाड पोलीस ठाण्यात येथे मुलीची मिसींग दाखल करण्यात आली. करमाड ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी याबाबत तातडीने पावले उचलत मुलीचा कसोशीने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना हि मुलगी लग्न करण्याच्या उद्देशाने पळुन गेल्याचे समजले. या मिसिंगचा तपास करणारे पोलीस अंमलदार आनंद घाटेश्वर यांनी तात्काळ मुलीचे वडिल व इतर नातेवाईक यांचेशी संपर्क करून त्यांना मुलगी सुखरूप असुन तिला लग्न करायचे असल्याचे कळविले.

परंतु मुलीचे आई – वडिल व इतर नातेवाईक यांनी सुरुवातीस या विवाहास विरोध दर्शविला. परंतु त्यांचे या विवाहाबाबत असलेले गैरसमज तसेच मुलीच्या भविष्याबाबत कायदेशीर बाबींची माहिती देण्यात आली. तसेच पोलीसांनी त्यांचे समुपदेशन केल्याने दोन्ही कडील कुटुंबीयांनी या विवाहाला मान्यता दिली.

त्यानुसार काल (दि.७) पळशी येथील पोलीसांच्या मध्यस्थीने अत्यंत साधेपणाने मुलीच्या आई- वडिल यांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे लावुन दिला आहे. याबाबत करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांनी विशेष प्रयत्न केले असुन दोन्ही कुटुंबांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या